पीटीआय, वायनाड
केरळच्या वायनाडमधील भूस्खलनात मृतांचा आकडा शनिवारी २१९ वर पोहोचला आहे. यामध्ये ९० महिला, ३० मुलांचा समावेश असल्याची माहिती प्रशासनाने दिली. २१९ मृतांपैकी १५२ जणांची ओळख पटवण्यात आली आहे. ५१८ नागरिकांना रुग्णालयात दाखल केले असून, ८९ जणांवर उपचार सुरू आहेत, असेही प्रशासनातर्फे सांगण्यात आले. दरम्यान, ३० जुलैपासून सुरू झालेले शोध आणि बचाव कार्य अंतिम टप्प्यात पोहोचल्याची माहिती केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी दिली.
वायनाडमधील भूस्खलनात २०६ नागरिक अद्यापही बेपत्ता आहेत. शनिवारी सकाळी १३०० जणांच्या बचावपथकाने अवजड यंत्रसामग्री आणि अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्याने पुन्हा शोधमोहीम सुरू केली. मृतदेहांची ओळख पटवणे अवघड होत आहे. चलियार नदीपात्रातून अनेकांचे अवशेष गोळा करण्यात आले आहेत. ६७ मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
हेही वाचा >>>“आई-बाबा सॉरी, हे हॉस्टेलवाले…”, UPSC करणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थीनीची दिल्लीत आत्महत्या!
पीडितांसाठी १०० घरे
बंगळुरू : भूस्खलनग्रस्तांसाठी १०० घरे बांधण्याची घोषणा कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांनी शनिवारी केली. वायनाडमधील भीषण दुर्घटनेनंतर कर्नाटक राज्य केरळच्या पाठीशी एकजुटीने उभे असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी ‘एक्स’वर म्हटले आहे.