सुहास बिऱ्हाडे

वसई : इस्रायलवर झालेल्या सर्वात भीषण हल्ल्यामुळे प्रत्येक इस्रायली नागरिक पेटून उठला आहे. प्रत्येक घरातून किमान एक तरुण युद्धासाठी रवाना झाला आहे. आम्ही शेवटपर्यंत लढू आणि जिंकू असा निर्धार तेथील नागरिक व्यक्त करीत आहेत. काही काळ मुंबईमध्ये राहिलेले अवराहम नागावकर यांनी हीच भावना ‘लोकसत्ता’शी केलेल्या संभाषणात व्यक्त केली.

अवराहम यांचे कुटुंब दुसऱ्या महायुद्धाच्या काळात भारतात आले. ते मुंबईमध्ये वास्तव्याला होते. १९६७ साली ते इस्रायलचे रहिवासी झाले. त्यांची बहीण आजही वसईमध्ये राहते. ते स्वत: उत्तम मराठी बोलतात. दूरध्वनीवरून साधलेल्या संवादामध्ये हमासच्या हल्ल्यानंतर तेथील परिस्थितीची माहिती देताना अवराहम यांना रडू कोसळले. हल्ल्यानंतर संपूर्ण देशात भीषण परिस्थिती होती. मात्र आता आठवडाभरानंतर सावरलेला प्रत्येक इस्रायली नागरिक हल्ल्याचा प्रतिशोध घेण्यासाठी आतुर झाला आहे. ‘‘आम्हाला कुणाची मदत नको. आम्ही एकटे लढण्यासाठी समर्थ आहोत,’’ असे इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी जाहीर केले आहे. हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी प्रत्येक इस्रायली सज्ज झाला आहे. प्रत्येक कुटुंबातील किमान एक जण युद्धभूमीकडे रवाना झाला आहे. डिमोरा या शहरात राहणारे अवराहम यांना वयामुळे लढण्यास जाता आले नसले तरी त्यांचा मुलगा लिओ लष्करात आहे. त्यांचा पुतण्या एरल आणि नवविवाहित मुलीचा पती आदिराम हेदेखील रणभूमीवर आहेत. ३० हजार लोकसंख्येचे डिमोरा शहर गाझा पट्टीपासून ६० किलोमीटर दूर आहे. शहरातील जनजीवन ठप्प असून शैक्षणिक संस्था बंद आहेत. जीवनावश्यक वस्तू मिळत आहेत. आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा, अशी सूचना नागरिकांना करण्यात आल्याचे अवराहम यांनी सांगितले.

त्यांनी केलेला हल्ला अमानुष विकृती आहे. सर्वत्र अस्थिर आणि अनिश्चिततेची परिस्थिती आहे. काहीही विपरीत घडू शकते. मात्र आम्ही शेवटपर्यंत लढू. – अवराहम नागावकर

Story img Loader