पीटीआय, नवी दिल्ली
‘न्यूजक्लिक’चे संस्थापक-संपादक प्रबीर पूरकायस्थ आणि मनुष्यबळ विभागप्रमुख अमित चक्रवर्ती यांना दिल्ली न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी बुधवारी दिली. पूरकायस्थ आणि चक्रवर्ती यांना दिल्ली पोलिसांनी मंगळवारी अटक केली. त्यांना बुधवारी न्यायालयासमोर हजर केले अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
दिल्ली पोलिसांनी आपल्याला एफआयआरची प्रत दिली नाही किंवा कोणत्या गुन्ह्यांसाठी तपास व चौकशी केली जात आहे याचीही माहिती दिली नाही असे ‘न्यूजक्लिक’ने बुधवारी सांगितले. यासंबंधी बुधवारी एक निवेदन प्रसिद्ध करून ‘न्यूजक्लिक’ने आपली भूमिका स्पष्ट केली.
हेही वाचा >>>मोदी सरकारची मोठी घोषणा; उज्ज्वला योजनेंतर्गत अवघ्या ६०० रुपयांत मिळणार सिलिंडर
पूरकायस्थ आणि चक्रवर्ती यांच्यावर चीनच्या समर्थनार्थ प्रचार करण्यासाठी परदेशातून बेकायदा पैसे घेतल्याच्या आरोपावरून कारवाई करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी मंगळवारी सकाळी साडेसहा वाजता सुरू केलेल्या कारवाईत ‘न्यूजक्लिक’चे कार्यालय सील केले, ३०पेक्षा जास्त ठिकाणी शोध कारवाई केली, तसेच अनेक पत्रकारांची चौकशी केली. ही चौकशी कित्येक तास चालली. यामध्ये माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांच्या अधिकृत निवासस्थानावरही छापा टाकण्यात आला.
४६ संशयितांची चौकशी
हेही वाचा >>>Nobel Prize 2023 : रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा, क्वांटम डॉट्सचा शोध लावणाऱ्या तीन शास्त्रज्ञांचा सन्मान
सुरुवातीला देण्यात आलेल्या माहितीनुसार नऊ महिलांसह ४६ संशयितांची चौकशी करण्यात आली आणि लॅपटॉप व मोबाइल फोनसह डिजिटल उपकरणे, कागदपत्रे तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आली. पोलिसांनी चौकशीसाठी विविध मुद्दय़ांवर २५ प्रश्नांची यादी तयार केली होती. त्यामध्ये दिल्लीमधील दंगली, परदेश प्रवासाचे तपशील आणि शेतकऱ्यांचे आंदोलन यांच्याशी संबंधित प्रश्न होते.
त्यांनी मला तेच तेच प्रश्न वारंवार विचारले. त्यांनी मला विचारले की मी ‘न्यूजक्लिक’चा कर्मचारी आहे का, मी सांगितले नाही, मी सल्लागार आहे. मी दिल्ली दंगलीचे वार्ताकन केले का असे त्यांनी मला विचारले. मी सांगितले नाही. शेतकऱ्यांच्या आंदोलनाबद्दल विचारले, मी हो म्हणालो. – परंजॉय गुहा ठाकुरता, ज्येष्ठ पत्रकार