Garba Cancelled : नवरात्रोत्सवानिमित्त सर्वत्र गरबा आणि दांडियाचे आयोजन केले जाते. पण गेल्या काही वर्षांपासून गरबा निमित्त अनेक धार्मिक वाद उफाळून येऊ लागले आहेत. आता तर बजरंग दलाने मोठा दावा केला आहे. यामुळे गरबा कार्यक्रमाचं आयोजनच रद्द करण्यात आलं आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इंदूरमधील भवरकुवा परिसरात गेल्या ३५ वर्षांपासून नवरात्रोत्सवाचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमाचे आयोजक फिरोज खान यांच्यावर लव्ह जिहादचा प्रचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. “या कार्यक्रमाचा उपयोग हिंदू महिला आणि मुस्लीम पुरुषांमधील संबंध वाढवण्यासाठी केला जातो”, असा आरोप स्थानिक बजरंग दलाने केला आहे. यासंदर्भात त्यांनी पोलिसांकडे तक्रारही केली आहे.

“आम्ही या आयोजकावर यापूर्वी कारवाई करू शकत नव्हतो. यावर्षी आम्हाला वेळेत माहिती मिळाली आणि त्यांचा कार्यक्रम रद्द केला. आम्ही स्थानिक पोलिसांकडे तक्रार देखील केली आहे”, बजरंग दलाचे नेते तन्नू शर्मा म्हणाले.

हेही वाचा >> Garba Pandal: ‘गरब्यात प्रवेश करण्यासाठी गोमूत्र प्राशन करायला द्या, जेणेकरून…’, भाजपा नेत्याचे अजब तर्कट

कार्यक्रमाचे आयोजक खान यांनी या वादावर नाराजी व्यक्त केली. “गेल्या ३५ वर्षांपासून येथे नवरात्रोत्सव साजरा केला जातो. मी २५ वर्षांपासून या कार्यक्रमाच्या कामासाठी गुंतलो आहे आणि गेल्या १५ वर्षांपासून मी स्वतः या कार्यक्रमाचं नियोजन करतोय. आम्हाला यापूर्वी कधीही अशा समस्येचा सामना करावा लागला नाही.”

इंदूरचे पोलीस अधीक्षक ऋषिकेश मीना यांनी सांगितले की, पोलिसांचा या प्रकरणात कोणताही सहभाग नाही. “आम्ही कोणालाही परवानगी दिलेली नाही किंवा आम्ही कोणत्याही कार्यक्रम आयोजकांना त्यांचा कार्यक्रम रद्द करण्यास भाग पाडले नाही. स्थानिक पक्षांमधील वादामुळे ही घटना घडली.”

इंदूरची दुसरी घटना काय?

अलीकडेच, इंदूर भाजपाचे जिल्हाध्यक्ष चिंटू वर्मा यांनी नवरात्रोत्सवाच्या आयोजकांना गरबा मंडळात जाऊ देण्यापूर्वी त्यांना गोमूत्र प्यावे, असे आवाहन केल्याने वाद निर्माण झाला होता. प्रदेश भाजपा नेतृत्वाने त्यांना अशी विधाने करण्यापासून परावृत्त केल्यानंतर त्यांनी नंतर माघार घेतली.

पीटीआयने दिलेल्या बातमीनुसार चिंटू वर्मा म्हणाले की, गरब्याचे आयोजन करणाऱ्यांना आम्ही आवाहन केले आहे की, त्यांनी गरब्याच्या मंडपात प्रवेश करणारे हिंदूच आहेत का? याची खातरजमा केली पाहीजे. त्यासाठी त्यांनी मंडपात येणाऱ्यांना गोमूत्र प्राशन करण्यास दिले पाहीजे. हे करण्यामागे तुमचा विचार काय? असा प्रश्न विचारला असता वर्मा म्हणाले की, काहीवेळा भलतेच लोक गरब्याच्या ठिकाणी येत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे वेगळ्या चर्चा समोर आल्या होत्या.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The event was being used to foster relationships between hindu women and muslim men alleged bajrang dal sgk