अॅपल कंपनीबरोबरची कायदेशीर लढाई संपुष्टात
सॅन बेर्नार्दिनो येथे झालेल्या हल्ल्यात संबंधित हल्लेखोर दहशतवादी दाम्पत्याच्या घरात सापडलेल्या अॅपल फोनची संकेतावली एफबीआयने उघड केली असून, थोडक्यात त्या फोनचे माहिती मिळवण्यासाठी हॅकिंग केले आहे, यात अॅपल कंपनीची मदत घेण्यात आलेली नाही. अॅपल कंपनीने गुप्ततेच्या मुद्दय़ानुसार ही संकेतावली उलगडण्यास नकार दिला होता. या प्रकरणी न्यायालयाने सरकारला अॅपल कंपनीस संकेतावली उघड करण्याचा आदेश देण्याचा अधिकार नाही असा निकाल दिला होता. न्याय विभागाने सांगितले, की एफबीआयने नवीन पद्धत वापरून अॅपलच्या आयफोनमधील माहिती उलगडण्याचा मार्ग पत्करला आहे. कॅलिफोर्नियात सॅन बेर्नार्दिनो येथे २ डिसेंबरला झालेल्या हल्ल्याच्या वेळी चकमकीत पोलिसांनी सय्यद फारूक व त्याची पाकिस्तानी पत्नी तशफीन मलिक यांना ठार केले होते. या दाम्पत्याने त्या आधी १४ जणांना ठार केले होते. त्यामुळे घटनास्थळी सापडलेल्या आयफोनमधील माहिती उघड करण्यासाठी सरकारने अॅपल कंपनीला सांकेतांक सांगण्याची विनंती केली होती, पण कंपनीने तसे करण्यास नकार दिला होता. अमेरिकी सरकारने आता दुसऱ्यांची मदत घेऊन या फोनची संकेतावली उलगडली आहे. एफबीआयने अॅपलच्या आयफोनची संकेतावली उलगडून त्या फोनमधील माहिती घेण्यास सुरुवात केली आहे, त्यामुळे अॅपलच्या आयफोनमध्ये व्यक्तिगत माहिती सुरक्षित राहते हा भ्रमही एफबीआयने दूर केला आहे. आम्ही त्रयस्थामार्फत संकेतावली उलगडली असून या दाव्यात आम्ही पुढे जाणार नाही, असे अमेरिकेचे महाधिवक्ता एलिन एम. डेकर यांनी सांगितले.
दहशतवादी दाम्पत्याच्या फोनचे हॅकिंग करण्यात एफबीआय यशस्वी
अॅपल कंपनीने गुप्ततेच्या मुद्दय़ानुसार ही संकेतावली उलगडण्यास नकार दिला होता.
First published on: 30-03-2016 at 01:36 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The fbi successfully hack terrorist couple phone