शहरांमध्ये येणाऱ्या लोंढय़ांमुळे नागरी सेवांवर पडत असलेला ताण, नागरी सेवांच्या विस्तारासाठी भासत असलेली जागेची चणचण आणि कोलमडत असलेले व्यवस्थापन; यावर मात करण्यासाठी नवी ‘स्मार्ट’ शहरे निर्माण करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. त्यानुसार आता पहिले ‘स्मार्ट शहर’ गांधीनगरजवळ साबरमतीच्या काठी उभारले जात आहे.
पाणीपुरवठय़ासह अनेक नागरी सोयींचे जाळे अत्याधुनिक स्वरूपात जमिनीखाली बांधलेले हे पहिले शहर असून सध्या मात्र हे भूमिगत जाळे आणि दोन मोठय़ा कार्यालयीन इमारती सोडल्या तर या शहरात कोणत्याही खुणा दिसत नाहीत. २०२२पर्यंत देशात तब्बल १०० स्मार्ट शहरे उभारण्याची ग्वाही मोदी यांनी लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान दिली होती. २०५०पर्यंत देशातील शहरांमधील लोकसंख्या तब्बल ४० कोटींनी वाढण्याचा तर्क असून त्यासाठी नवी शहरे अटळ आहेत, असे नागरी तज्ज्ञांचे मत असले तरी नव्या शहरांबरोबरच सध्याच्या शहरांचाही व्यापक विचार झाला पाहिजे, असा सूरही उमटत आहे.
गुजरातची राजधानी असलेल्या गांधीनगरजवळच साकारणाऱ्या या शहराने देशातील नागरीकरणासमोर नवाच आदर्श निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. आजवर देशातील बहुतेक शहरांची उभारणी र्सवकष विचारातून झालेली नाही. ही स्मार्ट शहरे त्या दृष्टीने मार्गदर्शक ठरतील, असे ‘राष्ट्रीय शहरविषयक व्यवहार संस्थे’चे संचालक जगन शहा यांनी सांगितले.

Story img Loader