पीटीआय, बंगळुरू
भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) चांद्रयान-३ च्या विक्रम लँडर मॉडय़ूलवरील ‘चेस्ट’ पेलोडद्वारे चंद्राच्या पृष्ठभागावरील मोजलेल्या तापमानातील फरकाचा आलेख रविवारी प्रसिद्ध करण्यात आला. ‘‘ विक्रम लँडरवरील ‘चेस्ट’ पेलोडने तापमानाबाबत दिलेली ही पहिली माहिती आहे’’ असे इस्रोने सांगितले. पेलोडवर तापमान मोजण्यासाठी एक यंत्र असून ते पृष्ठभागाच्या १० सेंटीमीटर खोल जाण्यास सक्षम आहे.
इस्रोने दिलेल्या माहितीनुसार ‘चंद्र सरफेस थर्मो फिजिकल एक्सपेरिमेंट’ने (चेस्ट) चंद्राच्या पृष्ठभागावरील तापमानाची माहिती घेण्यासाठी दक्षिण ध्रुव्राच्या पृष्ठभागावरील मातीच्या तापमानाची नोंद घेतली. इस्रोने ‘एक्स’ समाज माध्यमावर याबाबतची माहिती प्रसारित केली आहे.
हेही वाचा >>>‘चांद्रयान-३’ नव्या भारताच्या जिद्दीचे प्रतीक; ‘मन की बात’मध्ये मोदींचे गौरवोद्गार
इस्रोने सांगितले की, यामध्ये १० तापमान सेंसर लावण्यात आले आहेत. प्रस्तुत आलेख वेगवेगळय़ा खोलीतील तापमानाचा फरक दर्शवितो. चंद्राच्या दक्षिण धुव्राचा अशा प्रकारचा पहिला आलेख आहे. आणखी विस्तृत माहिती घेण्याचे कार्य सुरू आहे.
हेही वाचा >>>“चांद्रयान मोहीम ही विज्ञान आणि उद्योगाचं यश”, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य
अहमदाबादच्या फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी (पीआरएल)च्या सहकार्याने इस्रोच्या विक्रम साराभाई अवकाश केंद्राच्या (व्हीएसएससी) स्पेस फिजिक्स लॅबोरेटरीच्या (एसपीएल) नेतृत्वाखालील पथकाने हे पेलोड विकसित केले आहे.
‘चांद्रयान’ चे लँडर मॉडय़ूल चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षितरीत्या अलगत उतरवून भारताने बुधवारी इतिहास रचला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत पहिला देश ठरला आहे.