जागतिक पातळीवर प्रतिकूल वातावरण असतानाही भारताने जो आर्थिक लवचीकपणा दाखविला तीच भारताची सर्वात मोठी शक्ती असल्याचे मत केंद्रीय अथमंत्री अरुण जेटली यांनी शनिवारी येथे व्यक्त केले. भारताने आर्थिक सुधारणांबाबत जी आश्वासने दिली आहेत ती पूर्ण होतील का या बाबत सुस्पष्टता नसल्याचे ‘मूडी’ या जागतिक पातळीवरील संस्थेने म्हटलेले असतानाच जेटली यांनी वरील मत व्यक्त केल्याने त्याला विशेष महत्त्व दिले जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लवचीकपणा आणि त्याला असलेली रुपेरी किनार हीच भारताची आर्थिक शक्ती आहे. भारत ही सर्वात वेगवान नसली तरी वाढती मोठी अर्थव्यवस्था आहे आणि ही बाब निर्विवाद आहे, असेही जेटली म्हणाले. शनिवारी येथे आयोजित करण्यात आलेल्या रिअल इस्टेट परिषदेत अर्थमंत्री बोलत होते.
महसूल गोळा करण्याच्या बाबतीत जे संकेत मिळत आहेत ते आशावादी आहेत. जागतिक वातावरणाचा परिणाम निर्यातीत घसरण होण्यात दिसून आला. जागतिक पातळीवर जी मिळकत झाली ती जलसंपदा आणि पायाभूत सुविधासाठी वापरण्यात येत असून ऊर्जा क्षेत्राची स्थिती सुधारणे हेही अत्यंत महत्त्वाचे कार्य आहे, असेही अर्थमंत्री म्हणाले.
शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या मूडीच्या अहवालात, भारत दिलेली आश्वासने पूर्ण करू शकेल का, या बाबत शंका व्यक्त करण्यात आली होती. रस्ते आणि महामार्ग यांच्यानंतर आता आम्ही ऊर्जाक्षेत्राकडे लक्ष देण्याचे ठरविले आहे. या बाबत केंद्र सरकार राज्य सरकारे, बँका आणि रिझव्‍‌र्ह बँकेशी चर्चा करीत आहे. ऊर्जा क्षेत्राच्या पुनर्रचनेच्या पॅकेजबाबत चर्चा सुरू आहे. वितरण आणि निर्मिती कंपन्यांचे कर्ज या बाबतही चर्चा केली जात आहे, असेही जेटली म्हणाले.
व्याजाच्या दरांमुळे रिअल इस्टेट क्षेत्रावर विपरीत परिणाम झाला आहे. त्याचप्रमाणे आम्ही काही कालावधीसाठी महागाई नियंत्रणात ठेवणे ही गरज होती आणि सुदैवाने ते झाले. त्यामुळे आपल्याला गेल्या वर्षांकडे समाधानाने पाहता आले. दरांबाबत रिझव्‍‌र्ह बँकेनेही चार वेळा सकारात्मक पावले उचलली. ही स्थिती अशीच राहील अशी अपेक्षा करू या आणि जागतिक दर रचनेत महागाई नियंत्रणात ठेवणे आपल्याला शक्य होईल, असेही ते म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The flexibility is power of indian economy