अफगाणिस्तानात तालिबान पुन्हा एकदा सत्ता प्रस्थापित केल्यानंतर नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. देश शरिया कायद्यानुसार चालेल, असं तालिबाननं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे दुसऱ्या धर्मातील लोकांनाही या कायद्याचं जबरदस्तीने पालन करावं लागणार आहे. अफगाण नागरिकांना देशाचं भविष्य अंधारात दिसत असल्याने पलायन सुरु झालं आहे. आतापर्यंत हजारो नागरिकांनी अफगाणिस्तान भीतीने सोडून दिलं आहे. अफगाणिस्तानातील अल्पसंख्याक शिखांनाही भविष्याची चिंता सतावत आहे. २३ ऑगस्टला तीन विमानातून अफगाणिस्तान असलेल्या १४९ जणांना भारतात आणण्यात आलं. यात तीन शिखांचा समावेश होता. यावेळी त्यांनी सोबत पवित्र श्री गुरु ग्रंथ साहिबही घेऊन आले. शेवटच्या सहा ग्रंथांपैकी असलेल्या तीन ग्रंथांना अफगाणिस्तानातून बाहेर काढण्यात आलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तीन शीख नागरिक डोक्यावर श्री गुरु ग्रंथ साहिब घेऊन अनवाणी विमानतळावर आले होते. हा फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. काबुलमधील हामिद करजई विमानतळावरील हा फोटो आहे. श्री गुरु ग्रंथ साहिब पवित्र ग्रंथ आहे. गुरबानीत आध्यात्मिक शिकवण मिळते. यात संस्थापक गुरु नानक देव यांच्यासह शीख धर्माच्या दहा गुरुंची शिकवण आहे. भारतीय वायुसेनेकडून अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीय आणि अल्पसंख्याक समुदायाला भारतात आणलं जात आहे.

“आम्ही आमच्यासोबत श्री गुरु ग्रंथ साहिबचे तीन सरूप घेऊन आलो. आफगाणिस्तानातून भारतात येताना आम्ही आमच्या गुरुंना मागे सोडू शकत नाही. अफगाणिस्तानात शीख धर्माचा अशा पद्धतीने शेवट होणे अत्यंत दु:खदायक घटना आहे. आमच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. कारण तिथे त्यांची सेवा करायला कुणीच नसतं. म्हणून आम्ही त्यांना सुरक्षितपणे बॅगमध्ये पॅक करून भारतात आणलं”, असं भारतात आलेल्या शीख नागरिकाने इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितलं. अफगाणिस्तानातून यापूर्वीही श्री गुरु ग्रंथ साहिब सरूप स्थलांतरीत करण्यात आलं होतं. २५ मार्च २०२० रोजी काबुलमधील गुरुद्वारा हर राय साहिबवर हल्ला झाल्यानंतर त्याचं स्थलांतर करण्यात आलं होतं. इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी गुरुद्वारात घुसून २५ शीख बांधवांची हत्या केली होती. अफगाणिस्तानच्या वेगवेगळ्या गुरुद्वारांमधून सात सरूप आतापर्यंत भारतात आणण्यात आले होते. केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी, परराष्ट्र राज्यमंत्री वी मुरलीधरन आणि भाजपा नेते आरपी सिंह यांनी विमानतळावर गुरु ग्रंथ साहिबचं सरुप घेतलं. यावेळी ग्रंथ डोक्यावर घेऊन दिल्ली विमानतळावरून बाहेर आले.


“अफगाणिस्तानात गुरू ग्रंथ साहिबचे १३ सरूप होते. त्यापैकी ७ यापूर्वी भारतात आणण्यात आले होते. आता आणखी तीन सरूप आणण्यात आले आहेत. आता तिथे ३ सरूप आहेत. ते सुद्धा लवकरच भारतात आणले जातील.”, असं कार्टे परवन गुरुद्वारा समितीचे सदस्य छबोल सिंह यांनी सांगितलं.