मंगळावर गूढ स्वरूपाचे ढग सापडले असून त्यामुळे वैज्ञानिक कोडय़ात पडले आहेत. तेथील वातावरणाचा अभ्यास चालू असताना हे ढग सापडले. एप्रिल २०१२ मध्ये दोन वेळा हौशी खगोलवैज्ञानिकांना या ग्रहावर हे ढग दिसले व त्यांचा आकार पिसाऱ्यासारखा होता.  
  दोन्ही निरीक्षणात साधारण २५० कि.मी. उंचीपर्यंत या ढगांचा पिसारा फुललेला होता. तुलनात्मक विचार करता अशीच वैशिष्टय़े पूर्वीही दिसली होती, पण ते ढग १०० कि.मी. उंचीपेक्षा जास्त नव्हते.
२५० किलोमीटपर्यंत ढगांचा पिसारा व बाहेरच्या वातावरणात त्याचे बारीक होत जाणे ही विचित्र वैशिष्टय़े मानता येतील, असे स्पेनमधील ऑगस्टीन सँचेझ लॅवेंगा यांनी नेचर या नियतकालिकातील शोधनिबंधात म्हटले आहे.
 १० तासात हे ढग तयार झाले व त्यांनी १००० बाय ५०० कि.मी.चा भाग व्यापून टाकला असे दिसत होते. दहा दिवस हे ढग दृष्टीस पडले व दिवसेंदिवस त्यांचा आकार बदलत होता असे संशोधकांचे मत आहे. मंगळाभोवती फिरणाऱ्या यानांनाही तेथील या ढगांचा मागमूस लागलेला नाही कारण त्यांची भौमितिक व प्रदीप्तीय योजना वेगळी आहे.
 हबल अवकाश दुर्बीणीने १९९५ ते १९९९ या काळात जी छायाचित्रे टिपली आहेत व २००१ ते २०१४ चा जो माहितीसंग्रह आहे त्यांची तुलना करता मंगळावर हे ढग नेहमी नसतात. साधारण १०० कि.मी. इतकी त्यांची उंची असते.
१७ मे १९९७ मध्ये पिसाऱ्यासारखे ढग प्रथम हबल दुर्बीणीला दिसले होते व नंतर २०१२ मध्ये हौशी खगोलशास्त्रज्ञांनाही त्यांचे दर्शन घडले होते. पिसाऱ्यासारख्या या ढगांचे स्वरूप व कारणे समजून घेण्याचा प्रयत्न आता वैज्ञानिक करीत आहेत.
ऑगस्टिन यांनी सांगितले की, पाण्याचे बर्फाचे  किंवा कार्बन डायॉक्साईडचे बर्फ व धूळ यामुळे ते बनले असावेत पण ते सिद्ध करण्यासाठी अधिक उंचीवर असे ढग तयार होण्यासाठी आवश्यक असलेले प्रारूप मांडावे लागेल. युरोपीय अवकाश संशोधन संस्थेचे गार्सिया मुनोझ यांच्या मते हा ध्रुवीय प्रकाशाचा खेळ असावा कारण तेथे चुंबकीय क्षेत्रही जास्त आहे. ध्रुवीय प्रकाशातून बाहेर फेकल्या जाणाऱ्या प्रारणांनी ते ढग बनले असावेत.