वृत्तसंस्था, सोल
दक्षिण कोरियाचे अध्यक्ष यून सुक योल यांनी देशात ‘मार्शल लॉ’ लागू करण्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. हा निर्णय म्हणजे प्रशासनाचाच एक भाग असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, बंडाच्या आरोपांचे खंडनही केले. महाभियोगाद्वारे हटविण्याच्या प्रयत्नांना निष्प्रभ करण्यासाठी शेवटपर्यंत लढू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, यून यांच्याविरोधात गुरुवारी विरोधकांनी पुन्हा महाभियोगाचा ठराव मतदानासाठी आणला आहे.
यून यांच्या भाषणानंतर प्रमुख विरोधी पक्षाने तत्काळ त्यांच्यावर टीका केली. यून यांचे भाषण म्हणजे त्यांना झालेल्या संभ्रमाचे आणि चुकीच्या कथानकाचे प्रदर्शन असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. दक्षिण कोरियाच्या संसदेत विरोधकांचे वर्चस्व आहे. यून यांच्यावरील महाभियोगाचा ठराव आणण्यासह यून यांचे पोलीस प्रमुख आणि कायदामंत्र्यांविरोधातील महाभियोग आणि निलंबनाचा ठराव विरोधकांनी संसदेत मंजूर करून घेतला. विरोधकांच्या या कृतीमुळे यून यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत.
हेही वाचा : अजितदादा सहकुटुंब पवारांच्या भेटीला, वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी नेत्यांची गर्दी
च
यून यांनी ३ डिसेंबर रोजी ‘मार्शल लॉ’ देशात लागू केला. अगदी थोडा काळच हा कायदा देशात लागू राहिला. वाढत्या दबावामुळे यून यांना अवघ्या सहा तासांत ‘मार्शल लॉ’ मागे घ्यावा लागला. ‘मार्शल लॉ’ लागू केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर राजकीय गोंधळ उडाला आणि निदर्शने झाली. यून यांच्या हकालपट्टीची मागणी करण्यात आली.
लष्कराच्या जवानांकडून संसदेला घेरण्याचा आणि निवडणूक आयोगावर छापा टाकण्याचा प्रयत्न झाला. संसदेने एकमताने ‘मार्शल लॉ’ रद्द करण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा : राज्यसभेत सलग दुसऱ्या दिवशी गोंधळ, कामकाज तहकूब; काँग्रेस, भाजपचे आरोप-प्रत्यारोप
विरोधकांवर टीका
यून यांनी गुरुवारी केलेल्या भाषणात विरोधकांना सैतान आणि देशविरोधी शक्ती म्हणून संबोधले. उत्तर कोरियाशी हातमिळवणी आणि महाभियोगाच्या अधिकाराचा गैरवापर विरोधक करीत असल्याचा आरोप यून यांनी केला. या शक्तीशी शेवटपर्यंत लढा देण्याचा निर्धार यून यांनी केला.