देशाची फसवणूक करणाऱ्यांसाठी जगात कुठलीही जागा सुरक्षित असता कामा नये. कोणी कितीही ताकदवान असो, जर ती व्यक्ती राष्ट्रहीत आणि जनहीत यांच्यामध्ये येत असेल तर त्यावर कारवाई करतांना केंद्रीय यंत्रणांनी मागे रहाता कामा नये असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं. केंद्रीय मुख्य दक्षता आयोग आणि केंद्रीय अन्वेषण विभाग यांच्या संयुक्त परिषदमध्ये आभासी कार्यक्रमाद्वारे अधिकाऱ्यांना संबोधित करतांना हे परखड मत व्यक्त केलं आहे.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने २०१४ आधीच्या सरकारच्या कार्यपद्धतीवर टीकाही मोदी यांनी केली. याआधी सरकारमध्ये भ्रष्ट्राचार विरोधात कारवाई करण्याची राजकीय आणि प्रशासकीय इच्छाशक्तीची कमतरता होती. मात्र गेल्या सहा सात वर्षात विविध पावले उचलत भ्रष्टाचाराचे अनेक मार्ग बंद केले, डिजीटल तंत्रज्ञानाचा वापर करत विविध सुविधा आणल्या आहेत, लोकांच्या जीवनात सरकारचा हस्तक्षेप कमीत कमी ठेवला आहे. यामुळे भ्रष्टाचाराला वाव राहिला नाहीये असा दावाही पंतप्रधान यांनी यावेळी केला.

केंद्रीय यंत्रणेचे काम हे कोणाला घाबरावयाचे नाही असा सल्लाही मोदी यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिला. विनाकारण या यंत्रणेबद्दल असलेली लोकांच्या मनातील भिती ही काढून टाकली पाहिजे. आम्ही कठोर कायदे केले आहेत, ते कायदे लागू करणे तुमचं काम आहे. केंद्रीय यंत्रणांचे काम सुरू होतं जेव्हा घोटाळा, भ्रष्टाचार, अनियमितता सुरू होते तेव्हा. पण यापेक्षा प्रतिबंधात्मक दक्षतेवर काम करण्याची आवश्यकता आहे. म्हणजे यामुळे केंद्रीय यंत्रणांना काम करणं सोपं होईल आणि देशातील यंत्रणेचा वेळ वाचेल असंही मत मोदी यांनी यावेळी व्यक्त केलं.

Story img Loader