पीटीआय, नवी दिल्ली
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (माकप) दिवंगत सरचिटणीस सीताराम येचुरी यांना ‘इंडिया’ महाआघाडीतर्फे शनिवारी एका कार्यक्रमात श्रद्धांजली वाहण्यात आली. येचुरी हे या महाआघाडीला एकत्र बांधून ठेवणारा महत्त्वाचा घटक होते अशी भावना यावेळी घटक पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केली. येचुरी यांचे १२ सप्टेंबरला फुफ्फुसाच्या संसर्गामुळे निधन झाले.

यावेळी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी येचुरी यांच्या आठवणींना उजाळा देताना ते राजकीय व्यवस्थेमध्ये काम करणारे आपले मित्र होते अशा शब्दांमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘इंडिया’ तसेच ‘यूपीए’मध्ये त्यांनी काँग्रेस आणि अन्य पक्षांना जोडणारा पूल अशी भूमिका बजावली असे राहुल म्हणाले. आपल्या राजकीय कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीपासून आपण येचुरी यांचे निरीक्षण करत आलो असे त्यांनी सांगितले. ‘‘ते लवचिक होते, ऐकून घेणारे होते, अगदी वैचारिक विरोधकांचेही ऐकून घेत असत. त्यांच्यामध्ये आपण कुठून आलो आहोत हे समजून घेण्याची क्षमता होती,’’ असे राहुल म्हणाले. तर ‘इंडिया’ आघाडी अस्तित्वात आली त्याचे मोठे श्रेय येचुरी यांचे होते असे नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी सांगितले. श्रद्धांजली सभेला माकपच्या नेत्यांबरोबरच काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, फारुख अब्दुल्ला, समाजवादी पक्षाचे नेते रामगोपाल यादव, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे, द्रमुकच्या कन्निमोळी इत्यादी नेते उपस्थित होते.

Story img Loader