सुधारित नागरिकत्व कायद्यावरून (सीएए) ईशान्य दिल्लीतील जाफराबाद, मौजपूर भागात सोमवारी मोठ्याप्रमाणावर हिंसाचार उफळला. यावेळी मौजपूर भागात आंदोलनाने हिंसक वळण घेतलेले असताना बंदुकीच्या आठ गोळ्या चालवणाऱ्या तरुणाची ओळख दिल्ली पोलिसांना पटली असुन, त्याचे नाव शाहरुख असल्याचे समोर आले आहे. तो तेथील स्थानिक रहिवासी असल्याचेही सांगण्यात आले आहे. यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला अटक केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हा तरूण पोलिसांसमोर देखील गोळीबार करत होता. पोलिसांनी त्याला थांबवण्याचा देखील प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनाही न जुमनता त्यांने बंदुकीद्वारे आठ गोळ्या झाडल्या. दिल्लीतील हिंसाचाराच्या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.

आणखी वाचा – दिल्लीतील हिंसाचारावर ओवेसींनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

दिल्लीतील जाफराबाद, मौजपूर भागात सुधारित नागरिकत्व कायद्याचे विरोधक आणि समर्थक सलग दुसऱ्या दिवशी आमने-सामने आले होते. त्यांनी एकमेकांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्यानंतर रस्त्यांवरील वाहने, आसपासच्या घरांना तसेच, गोदाम-दुकाने यांनाही आग लावण्यात आली. एका तरुणाने पोलिसांवर पिस्तुल रोखून धरले आणि नंतर हवेत गोळीबार केला. या हिंसाचारात रतन लाल या पोलीस हवालदारासह पाच नागरिकांचा मृत्यू झाला. हिंसाचारात पोलीस उपायुक्तासह अनेक पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले.

आणखी वाचा – दिल्लीत हिंसाचाराचा आगडोंब

गृहराज्य मंत्री जी किशन रेड्डी यांनी दिल्ली हिंसाचाराबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले, ही घटना अत्यंत चुकीची आहे. मुद्दाम वाद निर्माण केला जात आहे. लोकशाहीच्या मर्यादेत राहून आपल्या भावना व्यक्त केल्या गेल्या पाहिजेत. दोन महिने राष्ट्रीय महामार्ग बंद ठेवला तेव्हा देखील आम्ही अडथळा निर्माण केला नाही. आता दगडफेक केली जात आहे, जाळपोळ केली जात आहे, सरकार हे सहन करणार नाही. यावर कठोर कारवाई केली जाईल, आम्ही जादा कुमक मागवली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The man who opened fire at police during violence in north east delhi yesterday has been detained msr