पीटीआय, वेस्ट पाम बीच

जगभरातील देशांवर लावण्यात आलेल्या आयातशुल्काच्या निर्णयापासून माघार घेणार नाही, असे अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले. जोपर्यंत इतर देश अमेरिकेबरोबरचा व्यापार अधिक संतुलित करण्यास सहमती देत नाहीत, तोपर्यंत ते आयातीवर नवीन शुल्क लावण्याच्या निर्णयापासून मागे हटणार नाहीत, असे ट्रम्प म्हणाले. या निर्णयामुळे जागतिक वित्तीय बाजार हादरले आहेत आणि मंदीची भीती निर्माण झाली.

‘एअर फोर्स वन’मध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले, जागतिक बाजारात घसरण व्हावी, अशी माझी इच्छा नाही. मात्र मोठ्या प्रमाणात शेअर विक्रीचीही चिंता नाही. कधीकधी तुम्हाला काहीतरी दुरुस्त करण्यासाठी औषध घ्यावे लागते.

जागतिक बाजारांत सोमवारी तीव्र घसरण सुरू झाल्यानंतर ५० हून अधिक देशांनी आयातशुल्क धोरण उठवण्यासाठी ट्रम्प प्रशासनाशी वाटाघाटी सुरू केल्या आहेत. त्यानंतर ट्रम्प यांनी याबाबत टिप्पणी केली. ‘‘मी जगभरातील अनेक नेत्यांशी बोललो. ते करार करण्यासाठी उत्सुक आहेत. अमेरिका यापुढे व्यापार तूट स्वीकारणार नाही. एक तर आम्ही व्यापारी संबंध तोडू किंवा नफा कमवू,’’ असे ट्रम्प म्हणाले.