सरकारच्या भूमिकेमुळे सध्या कोणालाही सैन्यात जावेसे वाटत नसल्याची टीका माजी लष्करप्रमुख व्ही.पी. मलिक यांनी केली आहे. सैनिकांकडून त्यांचा अभिमान आणि दर्जा हिरावून घेतला जात असल्यामुळे सैनिकी पेशा अनाकर्षक बनला आहे. त्यामुळे तरूणांसाठी सैनिकी पेशा तितकासा प्राधान्याचा राहिलेला नाही. ही गोष्ट भारतीय सैन्य आणि देशासाठी खचितच चांगली नाही. माझा आक्षेप सरकारकडून दिल्या जाणाऱ्या गोष्टींवर नाही, तर ते ज्याप्रकारे दिले जात आहे, त्याबद्दल आहे, असे मलिक यांनी म्हटले.

आत्महत्या करणारा माजी सैनिक काँग्रेसचा कार्यकर्ता – व्ही के सिंह
माझ्या संपूर्ण कारकिर्दीत देशाचे रक्षण करणारा प्रत्येक सैनिक महत्त्वाचा आहे, असेच मी मानत होतो. प्रत्येक सैनिकाची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे. मात्र गेल्या काही काळात सरकार आणि समाजातून सैनिकांची पत सातत्याने खालावत आहे, अशी खंत व्ही.पी. मलिक यांनी व्यक्त केली.

वन रँक वन पेन्शनच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतरमंतर येथे रामकिशन गढेवाल या माजी सैनिकाने आत्महत्या केली होती. या आत्महत्येवरून सध्या देशातील राजकारण चांगलेच तापले आहे. या संपूर्ण प्रकरणातील भूमिकेवरून विरोधकांकडून सरकारला लक्ष्य करण्यात येत आहे. दरम्यान, केंद्रीय राज्यमंत्री व्ही के सिंह यांनी केलेल्या विधानांच्या मालिकेमुळे या सगळ्या असंतोषात आणखीनच भर पडली आहे. आत्महत्या करणाऱ्या माजी सैनिकाची मानसिक स्थिती तपासायला हवी, असे विधान करून व्ही.के. सिंह यांनी वादाला तोंड फोडले होते. त्यानंतर वन रँक वन पेन्शनच्या मागणीसाठी आत्महत्या करणारे रामकिशन गढेवाल हे काँग्रेसचे कार्यकर्ते होते, असा आरोपही सिंह यांनी केला होता. गढेवाल हे काँग्रेसचे कार्यकर्ते असून त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर सरपंचपदाची निवडणूकही लढवली होती, असा दावा सिंह यांनी केला होता. तर हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनीही रामकिशन गढेवाल यांना शहीदाचा दर्जा देण्यास नकार दिला होता. सीमेवर लढताना मृत्यू झालेल्यांना शहीद म्हणतात, आत्महत्या करणा-यांना शहीद म्हणत नाही असे, खट्टर यांनी म्हटले होते. या सगळ्या विधानांमुळे सध्या माजी सैनिकांच्या मनात सरकारविषयी तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

आत्महत्या केलेल्या माजी सैनिकाच्या मानसिक आरोग्याची तपासणी करा- व्ही.के. सिंह

Story img Loader