मंगळाच्या संशोधनासाठी आपण आतापर्यंत इतर देशांकडून माहितीची उसनवारी करीत होतो पण आता भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या मार्स ऑर्बिटर (मॉम) यानामुळे मंगळाची अस्सल स्वदेशी माहिती उपलब्ध झाली आहे. मॉम यानावरील पाच वैज्ञानिक उपकरणांनी ही माहिती गोळा केली असून त्याच्या आधारे आपले वैज्ञानिक मंगळाविषयी नवीन गोष्टी जाणून घेऊ शकतील. मंगळ या लालसर ग्रहाच्या संशोधनाची माहिती नासा व इतर परदेशी संस्थांकडून घ्यावी लागत होती, त्या संस्थांकडे मंगळाची सर्वात जास्त माहिती आहे यात वाद नाही. अवकाश विभाग व भारतीय अवकाश संशोधन संस्थेने भारतातील सर्व खगोलशास्त्र संशोधन संस्थांना ही माहिती उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे ‘इस्रो’ने मॉमने पाठवलेल्या माहितीतून संशोधनाची नेमकी कोणती उद्दिष्टे ठेवण्यात आली आहेत हे जाहीर केले आहे. ती उद्दिष्टे पूर्ण करणाऱ्या प्रस्तावांचाच विचार केला जाणार आहे.मंगळाची ही माहिती ज्यांनी पेलोड तयार केले आहेत (ते सर्व इस्रोतीलच आहेत) त्यांना मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे संशोधकांना मंगळावरून आलेल्या माहितीचा अर्थ लावण्याची संधी मिळणार आहे. मंगळाचे वातावरण, त्यातील प्रक्रिया, धुळीची वादळे व ढगांची निर्मिती, भूपृष्ठ व भूगर्भशास्त्रीय माहिती तसेच मिथेनचा अभ्यास अशा अनेक गोष्टी त्यातून साध्य होणार आहेत. संपूर्ण वैज्ञानिक समुदायालाच या माहितीचा लाभ होणार असून ही माहिती मोफत उपलब्ध केली जाणार आहे, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. राष्ट्रीय विज्ञान संस्था या वैज्ञानिक, विद्यापीठे व सरकारी संशोधन संस्था यांच्याकडून संशोधन प्रस्ताव घेतील व ते योग्य वाटले, तर इस्रो ही माहिती त्यांना देईल. ज्या संस्थांकडे संशोधन सुविधा उपलब्ध असतील, तेथील निवृत्तीला किमान चार वर्षे राहिलेल्या व्यक्तीच या संशोधन प्रकल्पांचे नेतृत्व करण्यास पात्र असतील.
मार्स ऑर्बिटर मिशनमुळे स्वदेशी माहिती उपलब्ध
आतापर्यंत नासा व इतर संस्थांच्या माहितीवर अवलंबून
उद्दिष्टानुरूप संशोधन प्रस्ताव पाठवणाऱ्या निवडक संस्थांना माहिती मोफत
पेलोड तयार करणाऱ्या सर्वाना माहिती मोफत