भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या ‘हुंकार’ सभेपूर्वी गांधी मैदानात करण्यात आलेल्या स्फोटांमागे धार्मिक तेढ निर्माण करणे हेच उद्दिष्ट होते, असा दावा या स्फोटांमधील प्रमुख संशयित इम्तियाझ याने केला आहे. तसेच आपल्याला ‘इंप्रोव्हाईजड् एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस’ (आयईडी) तयार करण्याचे प्रशिक्षण झारखंड आणि बिहारमध्येच देण्यात आल्याचा कबुलीजबाबही इम्तियाझने यावेळी दिला. यासिन भटकळच्या अटकेचा सूड उगवण्यासाठीच हा हल्ला करण्यात आला, असेही चौकशीत पुढे आले आहे.
पाटणा स्फोटप्रकरणी प्रमुख संशयित म्हणून इम्तियाझ याला अटक करण्यात आली. त्याची सध्या कसून चौकशी सुरू असून त्याने यात अनेक बाबी उघड केल्या आहेत. बिहारच्या पोलिसांकडून आपल्याला कधीही ‘त्रास’ झाला नाही किंवा आपल्या कामात व्यत्ययही आला नाही, असे इम्तियाझ चौकशीदरम्यान म्हणाला.
यासिन भटकळ याला अटक करण्यात आल्यानंतर इंडियन मुजाहिदीनची सूत्रे सांभाळणाऱ्या मोहमद तेहसीन अख्तर याने आपल्याला असे सभास्थानी हल्ले करण्याविषयी सूचना दिल्या होत्या आणि त्यामागे राज्यात धार्मिक तेढ निर्माण करणे हेच उद्दिष्ट होते, अशी स्पष्ट कबुली इम्तियाझने पोलीस तपासात दिली. तसेच अख्तर याचे छायाचित्र पाहताच ‘हाच आपला हँडलर असल्याचे’ इम्तियाझने पोलिसांना सांगितले.
दरम्यान, अख्तरची माहिती देणाऱ्या व्यक्तीस राष्ट्रीय तपास संस्थेतर्फे १० लाखांचे इनाम जाहीर करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाच बाँब सापडले
पाटण्यातील गांधी मैदानात स्फोट होऊन दोन दिवसही होत नाहीत तोच मंगळवारी या परिसरात पाच बाँब सापडले. बुधवारी येथे आणखी एक सभा होणार असून त्याच्या पूर्वसंध्येस मैदानाची कसून तपासणी केली जात होती. त्या वेळी हे पाच बाँब सापडले.

‘इशारा दिला होता’
या साखळी बॉम्बस्फोटाबाबत आपण अगोदरच दहशतवादी हल्ल्याचा इशारा दिला होता, असे केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी म्हटले आहे.
त्यांनी येथे पत्रकारांना सांगितले, की आमच्याकडे पाटणा येथील सभेच्या वेळी दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेची विशिष्ट किंवा सर्वसाधारण माहिती होती हा भाग वेगळा, पण जेव्हा एखाद्या ठिकाणी सभा असते, तेव्हा तुमच्या राज्याला त्या वेळी असलेल्या धोक्याचे इशारे नियमितपणे दिले जातात. तुमच्या राज्यात सभा आहे, त्यामुळे हल्ल्याची शक्यता आहे, अशी सूचना देण्यात आली होती. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ७४व्या स्थापना दिनानिमित्त येथे आले असताना त्यांनी ही माहिती दिली़

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The objective of patna blast to create religious procession
Show comments