नवी दिल्ली : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता देणारा आणि त्यांना पक्षाचे ‘धनुष्यबाण’ हे मूळ चिन्ह देण्याचा ‘संपूर्ण तर्कयुक्त आदेश’ आपल्या अर्धन्यायिक अधिकारात दिला, असे निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले आहे.
‘निवडणूक चिन्हे (आरक्षण आणि आवंटन) आदेश, १९६८च्या परिच्छेदात नमूद केलेल्या अर्धन्यायिक अधिकारांचा वापर करून निवडणूक आयोगाने हा आदेश पारित केला आहे’, असे उद्धव ठाकरे यांच्या याचिकेवर दाखल शपथपत्रात आयोगाने नमूद केले आहे. एखाद्या अर्धन्यायिक संस्थेने पारित केलेल्या आदेशाला अपिलीय न्यायालयापुढे आव्हान देण्यात आले असेल, तेव्हा अशी संस्था या अपिलात ‘पार्टी’ (पक्षकार) केले जाण्याची आवश्यकता नसल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने अनेक प्रकरणांमध्ये दिला आहे, याचाही आयोगाने उल्लेख केला आहे.