वृत्तसंस्था, जेरूसलेम : गाझा पट्टीतील सत्ताधारी ‘हमास’ या दहशतवादी गटाने शनिवारी पहाटे इस्रायलवर केलेल्या अभूतपूर्व हल्ल्यात १०० जण ठार झाले आहेत. तर इस्रायलने प्रत्युत्तरादाखल गाझा पट्टीवर केलेल्या हल्ल्यात १९८ नागरिक ठार झाल्याचा दावा पॅलेस्टिनने केला आहे. ‘हमास’ने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यात साडेसाडशेहून अधिक जखमी झाल्याचे इस्रालयी संस्थांनी म्हटले आहे, तर इस्रालयच्या गाझावरील हल्ल्यात १,६१० लोक जखमी झाल्याचा दावा पॅलेस्टिनी आरोग्य मंत्र्यांनी केला आहे. हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलने गाझामध्ये अनेक हवाई हल्ले केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

किनारी भागाभोवतीच्या सीमेवर हमास आणि इस्रायली सैनिकांमध्ये जोरदार चकमक सुरू आहे. ‘हमास’ या दहशतवादी गटाने शनिवारी पहाटे इस्रायलवर अभूतपूर्व असा हल्ला केला. त्यात सुमारे ४० जणांचा मृत्यू, तर शेकडो नागरिक जखमी झाले आहेत. इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामीन नेतान्याहू यांनी ‘हमास’विरोधात युद्धाची घोषणा केली आणि शत्रूला मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा दिला. त्यानंतर इस्रायलने गाझा पट्टीवर अनेक हवाई हल्ले केले त्यात १९८ लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे.

हेही वाचा >>> इस्रायलवर हल्ला करणारी पॅलेस्टाईनमधील ‘हमास’ संघटना नेमकी काय आहे?

‘हमास’ने केलेल्या हल्ल्याचे वर्णन इस्रायल संरक्षण दलाने ‘प्रचंड’ असे केले आहे. इस्रायलवर अडीच हजार रॉकेटचा मारा करण्यात आला. त्याचबरोबर हमासचे दहशतवादी मजबूत तटबंदी असलेल्या सीमेवरून हवाई आणि समुद्रमार्गे इस्रायलच्या अनेक भागांत घुसले, असे सांगण्यात आले. इस्रायली लष्कर आणि ‘हमास’च्या दहशतवाद्यांमध्ये धुमश्चक्री सुरू आहे. आमचे सैनिक सात ठिकाणी घुसखोरांशी लढत आहेत, असे इस्रायली लष्कराने सांगितले, तर ‘हमास’च्या दहशतवाद्यांनी हवाई आणि सागरी मार्गाने घुसखोरी केल्याची माहिती इस्रायली नौदलाने दिली. इस्रायली लष्करी प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी शनिवारी इस्रायलच्या सात वसाहतींमध्ये आणि लष्करी तळांवर घुसखोरी केली. दहशतवादी स्डेरॉट शहरातही घुसले आहेत.

हेही वाचा >>> हमासने इस्रायलवर ५ हजार रॉकेट्स डागले, ४० जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदी म्हणाले, “या कठीण काळात…”

‘हमास’च्या हल्ल्यात आतापर्यंत ४० नागरिकांचा मृत्यू झाला असून, सुमारे साडेसातशेहून अधिक जखमी झाले आहेत, अशी माहिती इस्रायलची राष्ट्रीय आपत्कालीन वैद्यकीय सेवा, ‘मॅगेन डेव्हिड अ‍ॅडॉम’ने दिली. दक्षिण इस्रायलच्या बीरशेबा येथील सोरोका वैद्यकीय केंद्राने सांगितले, की या केंद्रात २८० जखमींवर उपचार सुरू आहेत. इस्रायलच्या लष्कराने जीवितहानीबद्दल अधिकृत तपशील जाहीर केलेला नाही. इस्रायली माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक जखमींना दक्षिण इस्रायलमधील रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. ‘हमास’च्या समाज माध्यम खात्यांवर अनेक ध्वनिचित्रफिती प्रसारित केल्या जात आहेत, त्यात ते इस्त्रायली लष्कराची लुटलेली वाहने चालवताना दिसत आहेत. एका प्रसारित चित्रफितीत इस्रायली सैनिकाचा मृतदेह गाझामध्ये पॅलेस्टिनींचा संतप्त जमाव ओढून नेत असताना दिसत आहे.

हेही वाचा >>> “ना मोहीम, ना गोळीबार…हे युद्ध आहे”, हमासच्या हल्ल्यानंतर नेतान्याहूंनी ठणकावलं; म्हणाले, “त्यांनी कल्पनाही केली नसेल अशी…!”

‘हमास’च्या लष्करी म्होरक्याने सर्व पॅलेस्टिनींना इस्रायलशी लढण्यास सज्ज राहण्याचे आवाहन केले. आम्ही पुरेसा संघर्ष करण्याचा निर्धार केला आहे, असे तो म्हणाला. ‘हमास’च्या हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामीन नेतान्याहू यांनी नागरिकांना उद्देशून केलेल्या भाषणात युद्धाला तोंड फुटल्याची घोषणा केली. नेतान्याहू यांनी दूरचित्रवाहिनीवरील आपल्या संबोधनात देशवासीयांना देश युद्धात उतरल्याचे सांगितले. ‘हमास’ने कधी कल्पनाही केली नसेल एवढी किंमत त्यांना चुकवावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. ते म्हणाले आपण युद्धात असून, ही निव्वळ लष्करी मोहीम नसून, युद्धाला सुरुवात झाली आहे.

विरोधकांची टीका

‘हमास’च्या हल्ल्यानंतर नेतान्याहू यांच्यावर विरोधकांनी तीव्र टीका केली आहे. विश्लेषकांनीही ‘हमास’च्या हल्ल्याचा अंदाज लावण्यात सरकार अपयशी ठरल्याची टिप्पणी केली आहे. नेतान्याहू सरकारने ‘गाझा’मधून येणाऱ्या धमक्यांविरूद्ध आक्रमक कारवाई केली होती. इस्रायलच्या सदैव अस्थिर सीमेवर काही आठवडय़ांपासून तणावात वाढ झाली होती. इस्रायलव्याप्त ‘पश्चिम किनारपट्टी’वर झालेल्या तीव्र संघर्षांनंतर ‘हमास’ आक्रमक झाल्याचे म्हटले जाते.

‘हमास’ची मोठी चूक, इस्रायलच जिंकेल!’

‘हमास’ या दहशतवादी गटाने इस्रायलविरुद्ध युद्ध पुकारले आहे. या युद्धात इस्रायलच जिंकेल, असा दावा संरक्षण मंत्री योव गॅलंट यांनी केला. तेल अवीव येथील इस्रायलच्या लष्करी मुख्यालयात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर संरक्षणमंत्री म्हणाले की ‘हमास’ने दक्षिण आणि मध्य इस्रायलवर रॉकेट हल्ले करून मोठी चूक केली आहे.

काय घडले?

  • ‘हमास’च्या हल्ल्यात १०० इस्रायली नागरिक ठार, शेकडो जखमी
  • इस्रायलच्या प्रतिहल्ल्यात १९८ पॅलेस्टिनी ठार झाल्याचा दावा
  • हमास दहशतवाद्यांची इस्रायल हद्दीत घुसखोरी
  • हमास दहशतवादी – इस्रायली लष्करात सीमांवर धुमश्चक्री
  • हमास दहशतवाद्यांनी अनेक इस्रायली नागरिक आणि सैनिकांना गाझामध्ये ओलीस ठेवल्याचे वृत्त.

‘हमास’चे ‘ऑपरेशन अल-अक्सा स्टॉर्म!’

‘हमास’च्या लष्करी शाखेचा नेता मोहम्मद डेफ याने सांगितले की, ‘हमास’च्या सशस्त्र गटाने इस्रायलविरुद्ध नवी लष्करी मोहीम सुरू केली आहे. इस्रायलविरोधात ‘ऑपरेशन अल-अक्सा स्टॉर्म’ ही मोहीम राबवण्यात येत असून, त्याअंतर्गत शनिवारी पहाटे इस्रायलवर पाच हजार ‘रॉकेट’ डागण्यात आले, तर इस्रायली संस्थांच्या म्हणण्यानुसार २५०० रॉकेट डागण्यात आले.

‘युद्धाला तोंड’

‘हमास’ने कधी कल्पनाही केली नसेल एवढी किंमत त्यांना चुकवावी लागेल. ही लष्करी कारवाई नाही, तर युद्धाला तोंड फुटले आहे, असे इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामीन नेतान्याहू यांनी दूरचित्रवाणीवरून सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The outbreak of war in the gaza strip israel counter attack after hamas attack ysh