नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतूद देशाचे हित डोळय़ासमोर ठेवून केली असून मेहुणा वा पुतण्याला लाभ मिळवून देण्यासाठी नाही. कोणाच्या भल्यासाठी धोरणे राबवण्याची संस्कृती काँग्रेसची असून मोदी सरकारची नाही, असे ठणकावत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काँग्रेसच्या अदानी समूहाच्या हितसंबंधांच्या आरोपांना अप्रत्यक्ष प्रत्युत्तर दिले.
केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये हरित उर्जेच्या क्षेत्रात ३५ हजार कोटींची तरतूद केली आहे. लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी या तरतुदीचा संबंध अदानी समूहाच्या हरित उर्जा क्षेत्रातील मोठय़ा गुंतवणुकीशी जोडला. काहींना डोळय़ासमोर ठेवून हरित उर्जा क्षेत्रात केंद्र सरकारने तरतूद केल्याचे अधीररंजन भाषणात म्हणाले होते. अदानी प्रकरणावरून विरोधकांनी कोंडी करण्याचा प्रयत्न केला असतानाही केंद्र सरकारने अजूनही भाष्य केले नाही. मात्र, सीतारामन यांनी शुक्रवारी लोकसभेतील आक्रमक भाषणात केंद्र सरकारच्या वतीने किल्ला लढवला.
सीतारामन यांनी काँग्रेससह विरोधकांचे अनेक आक्षेप खोडून काढले. अल्पसंख्याक समाजासाठी होणाऱ्या तरतुदीत कपात केल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. त्यावर, तरतुदीवरून केंद्र सरकार एखाद्या समाजाविरोधात असल्याचे मानणे चुकीचे आहे. अर्थसंकल्पातील तरतुदीतून एखाद्या समाजावर प्रेम आहे की नाही, हेही सिद्ध होत नाही. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी अल्पसंख्याक समाजासाठी जास्त तरतूद करूनही नेल्लीमध्ये जातीय दंगल उसळली होती. १९८४ मध्ये दिल्लीमध्ये शीखांविरोधात दंगल झाली होती. १९६६ मध्ये गोहत्येसंदर्भात संसदेबाहेर हिंदू साधूंनी आंदोलन केल्यामुळे त्यांना मारहाण केली गेली, असा युक्तिवाद सीतारामन यांनी केला. नव्या करप्रणालीमध्ये वार्षिक सात लाखांचे उत्पन्न करमुक्त आहे. या प्रणालीमधील करसवलतीमुळे करदात्यांच्या हाती अधिक पैसे राहू शकतील. निम्न उत्पन्न गटातील करदात्यांना या प्रणालीचा अधिक लाभ मिळेल, असे त्या म्हणाल्या.
‘डेटॉलने चेहरा धुऊन या!’
काँग्रेसच्या नेत्यांनी भ्रष्टाचारावर बोलू नये. त्या आधी त्यांनी डेटॉलने चेहरा धुऊन यावे, अशा शब्दांत सीतारामन यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. राजस्थानच्या संदर्भातही बोलण्याची विनंती भाजपच्या सदस्याने केली. त्यावर, राजस्थानात तर फारच गडबड झालेली आहे. तिथे गेल्या वर्षीचा अर्थसंकल्प यावर्षी सादर झाला आहे. चुका कोणाकडूनही होऊ शकतात पण, अशी चूक करण्याची वेळ कोणावरही येऊ नये, असे म्हणत सीतारामन यांनी पुन्हा काँग्रेसवर टीका केली. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी शुक्रवारी गेल्या वर्षी सादर केलेल्या अर्थसंकल्पातील प्रस्तावना वाचून दाखवली. सात मिनिटांनंतर ही चूक गेहलोत यांच्या लक्षात आणून दिली गेली. या प्रकारामुळे राजस्थानमधील काँग्रेस सरकारवर भाजप टीका-टिप्पणी करत आहे.