भारताचे सौदी अरेबियाला साकडे

ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पेट्रोल व डिझेलचे दर वाढण्याची शक्यता असून तेल मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी तेलाच्या किमती आटोक्यात ठेवण्यासाठी सौदी अरेबियाला सक्रिय भूमिका पार पाडण्याची विनंती केली आहे. सौदी अरेबिया हा तेलाचा सर्वात मोठा दुसरा निर्यातदार देश आहे.

पेट्रोल व डिझेलचे दर एक महिन्यात लिटरला २ रूपये वाढले असून अमेरिका व चीन यांच्यातील व्यापार युद्ध संपण्याची चिन्हे असून ओपेकचा मित्र देश असलेला रशिया खनिज तेलाचा पुरवठा कमी करणार आहे, त्यामुळे किंमती वाढणार आहेत. प्रधान यांनी तेलाच्या वाढत्या दरांचा मुद्दा सौदी अरेबियाचे तेल मंत्री खालीद अल फलिह  यांच्याशी चर्चेत उपस्थित करून दर कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे. तेलाच्या वाढत्या किमतीबाबत प्रधान यांनी चिंता व्यक्त केली असून यात आता सौदी अरेबियाने भूमिका पार पाडावी असे म्हटले आहे. रविवारी जारी करण्यात आलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे, की प्रधान यांनी तेलाचा निर्यातदार असलेल्या सौदी अरेबियाला साकडे घालून तेलाच्या किमती वाढण्यापासून रोखण्याची विनंती केली आहे.  सौदी अरेबिया हा तेलाचा दुसऱ्या क्रमांकाचा मोठा निर्यातदार देश असून २०१७-१८ मध्ये भारताने सौदी अरेबियाकडून ३६.८ दशलक्ष टन तेल आयात केले होते, ते देशाच्या आयातीच्या १६.७ टक्के होते.

Story img Loader