एपी, सेऊल
उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांग येथे गुरुवारी संध्याकाळी पार पडलेल्या लष्करी संचलनाला रशिया आणि चीनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हजेरी लावली. अध्यक्ष किम जोंग उन यांच्या उपस्थितीत उत्तर कोरियाच्या लष्करी सामर्थ्यांचे या वेळी प्रदर्शन घडवण्यात आले. त्यामध्ये त्यांच्या सर्वात शक्तिशाली अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्रांचाही समावेश होता.
‘कोरिया युद्धा’च्या ७० व्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी या संचलनाचे आयोजन केले जाते. उत्तर कोरियात हा दिवस ‘विजय दिन’ म्हणून साजरा केला जातो. उत्तर कोरियाच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी शुक्रवारी या संचलनाविषयी माहिती दिली. रशियाचे संरक्षणमंत्री सर्गेई शोइगु आणि चीनच्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना या सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी ली हाँगझोंग यांनी रोषणाईने उजळलेल्या किम द्वितीय संग स्क्वेअर येथे किम जोंग उन यांच्याबरोबर सज्जात बसून संचलनाची पाहणी केली.
संचलनामध्ये उत्तर कोरियाने अलीकडे घोषणा केलेल्या हॉसाँग-१७ आणि हॉसाँग-१८ या अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्रांबरोबरच टेहळणी आणि हल्ला करणाऱ्या ड्रोनचाही समावेश होता. हॉसाँग-१७ आणि हॉसाँग-१८ ही क्षेपणास्त्रे रशियाच्या डिझाईनवर आधारलेली आहेत असा दावा काही विश्लेषकांनी यापूर्वी केला आहे. उत्तर कोरिया आणि अमेरिकेदरम्यानचे संबंध विकोपाला गेले आहेत. या संचलनाच्या निमित्ताने किम जोंग उन यांनी आपली ताकद दाखवतानाच रशियाबरोबरची वाढती जवळीकही जाहीर केली.
हे संचलन पाहण्यासाठी मोठय़ा प्रमाणात गर्दी झाली होती. प्रेक्षकांनी मोठय़ा प्रमाणात सैनिकांना अभिवादन केले आणि प्रोत्साहन दिले. एका वृत्तानुसार, अलीकडील काळात या संचलनासाठी देशभरातून लोकांना आणले जाते. या वेळी किम जोंग उन हे शोइगु आणि ली यांच्याबरोबर अधूनमधून चर्चा करत होते. किम आणि शोइगु यांनी संचलन करणाऱ्या सैनिकांना हात उंचावून अभिवादनही केले. मात्र या वेळी किम यांनी भाषण केले की नाही याची माहिती देण्यात आली नाही. मात्र उत्तर कोरियाचे संरक्षणमंत्री कांग सुन नाम यांनी या संचलनाचे वर्णन ऐतिहासिक असे केले. ‘अमेरिकी साम्राज्यवादी आणि त्यांच्या अनुयायी देशांविरोधात आमच्या देशाच्या थोर विजयाचा हा ऐतिहासिक सोहळा आहे’, असे ते म्हणाले.