पीटीआय, नवी दिल्ली
‘विकसित भारत’ स्वावलंबनाच्या भावनेने ओतप्रोत आहे आणि ही भावना आणि गती २०२४ मध्येही कायम ठेवली पाहिजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सांगितले. ‘मन की बात’ या आकाशवाणीवरील मोदींच्या मासिक संवाद कार्यक्रमाच्या १०८ व्या आणि या वर्षांच्या अखेरच्या भागात पंतप्रधान मोदींनी शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरही भर दिला आणि ‘फिट इंडिया’साठी अनेक अनोख्या प्रयत्नांची माहिती दिली.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, जो देश नावीन्याला-नवोपक्रमाला महत्त्व देत नाही, त्याचा विकास ठप्प होतो. भारत नवनिर्मितीचे केंद्र बनला आहे. आपली ही वाटचाल अव्याहत चालणार, याचे हे प्रतीक आहे. या प्रवासात आपण आता थांबणार नाही. २०१५ मध्ये आम्ही जागतिक नवोपक्रम निर्देशांकात (ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स) ८१ व्या क्रमांकावर होतो. आज आपण ४० व्या स्थानावर आहोत. मोदींनी यावेळी चंद्रयान-३ मोहिमेच्या यशासह २०२३ मधील विविध क्षेत्रांत देशाच्या कामगिरीचा उल्लेख केला आणि देशवासीयांना नवीन वर्षांच्या शुभेच्छा दिल्या.
हेही वाचा >>>Year Ender 2023 : व्हॉट्सॲपच्या या ‘पाच’ घोटाळयांनी भारतीयांना घातला गंडा
आज भारताचा प्रत्येक कानाकोपरा आत्मविश्वासाने भारलेला आहे. विकसित भारत आणि स्वावलंबी भावनेने देश परिपूर्ण आहे. आगामी काळातही ही भावना कायम राखून वाटचालीची ही गती आपल्याला कायम ठेवायची आहे असे पंतप्रधानांनी सांगितले.
दिवाळीत झालेल्या विक्रमी व्यावसायिक उलाढालीचा उल्लेख करताना मोदी म्हणाले की, आज प्रत्येक भारतीय ‘व्होकल फॉर लोकल’ (स्थानिक उत्पादनांना प्राधान्य) या मंत्राला महत्त्व देत आहे. त्यांनी ऑस्कर विजेत्या ‘नाटू-नाटू’सह ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ या ऑस्करविजेत्या लघुपटाचाही उल्लेख केला.
अन्याय करणाऱ्यांकडून ‘न्याय यात्रा’!
लखनऊ : समाजावर अन्याय करण्यात कोणतीही कसर न सोडणारे आता ‘न्याय यात्रा’ काढत आहेत अशी टीका भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी रविवारी काँग्रेसवर केली. लखनऊ येथे जाहीर सभेत बोलताना नड्डा यांनी विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीलाही लक्ष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला पुढे नेत असताना ‘इंडिया’ आघाडी देशाला मागे ओढत आहे अशी टीका नड्डा यांनी केली.