काँग्रेसचे लोक, आमचे विरोधी कायमच ही टीका आमच्यावर करायचे की मंदिर वहीं बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे. आता मंदिर बांधलं आणि तारीखही सांगितली आता काँग्रेसचं काय म्हणणं आहे? असा तिखट सवाल भाजपा खासदार साध्वी निरंजन ज्योती यांनी केला आहे. तसंच काँग्रेसवर त्यांनी कडाडून टीका केली आहे. राम मंदिरात रामाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारीला होणार आहे. त्या अनुषंगाने देशभरात उत्साह आहे. काँग्रेसकडून मात्र यावर टीका होताना दिसते आहे. अशात भाजपा खासदार साध्वी निरंजन ज्योती यांनी काँग्रेसला सणसणीत उत्तर दिलं आहे.
काय म्हणाल्या साध्वी निरंजन ज्योती?
“मंदिर वहीं बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे असं म्हणत काँग्रेसचे लोक आमच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करायचे. मंदिर आता तयार झालं, प्राणप्रतिष्ठेची तारीख जाहीर झाली. रामलल्ला मंदिराच्या गाभाऱ्यात विराजमान होणार आहेत. आता काँग्रेसकडे कुठला प्रश्न उरलाय? राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रणही काँग्रेसला मिळालं आहे. त्यांच्या मनात जर रामाविषयी आस्था आहे, जर तुम्ही मर्यादा पुरुषोत्तम रामाला मानत असाल तर निमंत्रण स्वीकारा आणि रामाचं दर्शन घ्यायला पोहचा.” असं साध्वी निरंजन ज्योती यांनी म्हटलं आहे.
हे पण वाचा- “माझ्या मुलाने घडवलेल्या रामाच्या मूर्तीचं दर्शन करण्यासाठी..”, अरुण योगीराज यांच्या आईच्या डोळ्यात आनंदाश्रू
रामाचं अस्तित्व ज्यांनी नाकारलं त्यांना…
साध्वी निरंजन ज्योती पुढे म्हणाल्या, “रामाचं अस्तित्व ज्यांनी नाकारलं, रामाचा जन्म झालेलाच नाही असं जे म्हणाले, रामसेतू ज्यांनी नाकारला, ज्यांना रामाचं अस्तित्व मान्य नाही अशा लोकांना आमच्या भावना काय समजणार? त्यांना आम्ही काहीही समजवू शकत नाही.” असा टोलाही साध्वी निरंजन ज्योतींनी लगावला आहे.
६ डिसेंबर १९९२ या दिवशी बाबरी पाडण्यात आली
६ डिसेंबर १९९२ या दिवशी बाबरी मशिद पाडण्यात आली. या घटनेचे पडसाद देशभरात उमटले होते. भाजपाचे कार्यकर्ते, कारसेवक, विश्व हिंदू परिषद आदी सगळ्यांचा या प्रकरणात सहभाग होता. त्यानंतर मंदिर वहीं बनाएंगेची घोषणा भाजपाने केली. यावरुन काँग्रेसने त्यांना सातत्याने लक्ष्य केलं होतं. मंदिर वहीं बनाएंगे तारीख नहीं बताएंगे असं म्हणत काँग्रेसने संधी मिळेल तेव्हा टीका केली होती. राम मंदिराच्या मुद्द्यावर निवडणुकाही झाल्या. मात्र हे प्रकरण न्यायप्रविष्ट होतं. २०१९ मध्ये जेव्हा या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला तेव्हा राम मंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा झाला. आता अयोध्येत २२ जानेवारी रोजी मंदिराचं उद्घाटन होणार असून रामाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली जाणार आहे.