मध्य रेल्वेतील अधिकाऱ्यांवर काही दिवसांपूर्वीच करण्यात आलेल्या आरक्षण गैरव्यवहारांविषयीच्या आरोपांच्या पाश्र्वभूमीवर रेल्वे अर्थसंकल्पात प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापराद्वारे आरक्षण प्रणाली अधिक सुलभ व वापरकर्त्यांसाठी सोयीची करणारे काही निर्णय रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी जाहीर केले.
ई-तिकीट प्रणालीत आमूलाग्र बदल सुचविताना या प्रणालीची क्षमता प्रत्येक मिनिटास ७२०० तिकिटे देता येईल अशी करण्याचे तसेच एकाच वेळी १ लाख २० हजार जणांना तिकिटे काढता येतील अशी प्रणाली विकसित करण्याचे आश्वासन रेल्वेमंत्र्यांनी दिले. मोबाइल फोनद्वारे तिकिटांचे आरक्षण करण्यास तसेच पोस्ट ऑफिसमध्ये रेल्वे तिकिटांच्या विक्रीस उत्तेजन दिले जाईल, असे रेल्वेमंत्र्यांनी जाहीर केले.
फलाट तिकीट काढण्यासाठी काही रेल्वेस्थानकांमध्ये अनेकदा तासन्तास खोळंबून राहावे लागते. मात्र यापुढे रेल्वे फलाट तिकीट तसेच अनारक्षित तिकिटेदेखील इंटरनेटद्वारे व ऑनलाइन पद्धतीने मिळण्याची सुविधा उपलब्ध केली जाईल, असे गौडा यांनी सांगितले. आपल्या नातेवाईकांना सोडण्यासाठी आलेल्या नागरिकांना वाहनतळाची समस्या भेडसावते किंवा काही ठिकाणी वाहनतळाच्या वापराकरिता अवाजवी दर आकारले जातात. यावरील उपाय म्हणून फलाट आणि वाहनतळ वापराचे संयुक्त तिकीट लवकरच सुरू करण्यात येईल, असे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले.
तंत्रज्ञानाचा कल्पक वापर करून प्रवाशांची तिकिटांसाठी लावाव्या लागणाऱ्या लांबच लांब रांगांमधून सुटका व्हावी यासाठी सुटय़ा पैशांद्वारे तिकिटे वितरित करणारी यंत्रेही मोठय़ा प्रमाणावर रेल्वेस्थानकात बसविण्याचा मानस रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी व्यक्त केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा