वृत्तसंस्था, पीटीआय,
वैद्याकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या ‘नीट-यूजी’ परीक्षेचा निकाल नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) शनिवारी आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला. केंद्रनिहाय आणि शहरनिहाय पद्धतीने हा निकाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. ही परीक्षा ५ मे रोजी ५७१ शहरांमधील चार हजार ७५० केंद्रांवर घेण्यात आली होती. तर २३ जून रोजी फेरपरीक्षा होऊन त्याचे निकाल ३० जून रोजी जाहीर केले होते.
‘नीट-यूजी’ निकाल ४ जून रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यानंतर त्यामध्ये प्रश्नपत्रिका फुटणे आणि तोतयागिरीसारखे अनेक आरोप झाल्यानंतर त्याविरोधात जवळपास ४० याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या. परीक्षा रद्द करावी, पुन्हा घ्यावी आणि गैरप्रकारांचा न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास करावा अशा वेगवेगळ्या मागण्या या याचिकांमध्ये करण्यात आल्या आहेत. एका सुनावणीदरम्यान न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर शहरनिहाय आणि केंद्रनिहाय तपशील प्रसिद्ध करण्यात आले आहेत. या प्रकरणी पुढील सुनावणी २२ जुलैला होणार आहे.
हेही वाचा >>>आनंद दिघे यांच्याकडून हिंदुत्वाचे नाही तर संपूर्ण समाजाचे रक्षण- एकनाथ शिंदे
निकालामध्ये विद्यार्थ्यांची ओळख उघड करण्यात आलेली नाही. ‘एनटीए’द्वारे निकाल जाहीर झाल्यानंतर लवकरच समुपदेशनाचे वेळापत्रक जाहीर केले जाईल. वेळापत्रक आणि श्रेणीनुसार, उमेदवार समुपदेशनात सहभागी होऊन अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ शकतील.
फेरपरीक्षेत वेगळे चित्र
फेरपरीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचे चित्रही निकालांमधून समोर आले आहे. त्यापैकी अनेक विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी म्हणजे ७२० गुण मिळाले होते. मात्र, त्यापैकी कोणालाही त्या यशाची पुनरावृत्ती करता आली नाही. हरियाणाच्या हरदयाल पब्लिक स्कूल या केंद्रातील सहा विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले होते. तेथे ४९४ विद्यार्थ्यांनी फेरपरीक्षा दिली. त्यापैकी केवळ एका विद्यार्थ्याला ६८२ गुण मिळाले तर केवळ १३ विद्यार्थ्यांना ६०० किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळू शकले.
प्रमुख सूत्रधारासह आणखी तिघांना अटक
‘नीट-यूजी’ प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी सीबीआयने शनिवारी आणखी तिघांना अटक केली. त्यामध्ये या प्रकरणाचा प्रमुख सूत्रधार आणि दोन एमबीबीएस विद्यार्थ्यांचा समावेश आहे, अशी माहिती देण्यात आली. सीबीआयने या प्रकरणी अटक केलेल्यांची संख्या २१ झाली आहे.