पीटीआय, नवी दिल्ली

दिल्ली उच्च न्यायालयाचे न्या. यशवंत वर्मा यांच्या घरी आगीनंतर कथितरीत्या जळलेल्या अवस्थेत सापडलेल्या रोख रकमेप्रकरणी चौकशीचा दुसरा महत्त्वाचा टप्पा सुरू झाल्याने त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. याप्रकरणी चौकशी समिती नेमल्यानंतर शनिवारी रात्री उशिरा दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांचा अहवाल तसेच घटनेची ध्वनी-चित्रफीत व छायाचित्रे सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर जारी करण्यात आली. या पहिल्या टप्प्यातील तपासात तत्थ्य आढळल्यामुळेच सरन्यायाधीशांनी समिती नेमल्याचे सांगितले जात आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी २५ पानी चौकशी अहवाल सर्वोच्च न्यायालयाला सादर केला. घटना तपासल्यानंतर उपलब्ध सामग्री आणि न्या. यशवंत वर्मा यांनी दिलेला प्रतिसाद यानंतर प्रथमदर्शनी घटनेची अधिक चौकशी व्हावी असे मत यात मांडण्यात आले आहे. अहवालाचाच भाग असलेला घटनेची ध्वनीचित्रफीत, छायाचित्रे सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर जारी झाली आहेत. ध्ननीचित्रफितीमध्ये दिल्ली अग्निशामक विभागाचे कर्मचारी आग विझविताना दिसत असून त्यात अर्धवट जळालेल्या नोटा स्पष्टपणे दिसत आहेत. जळालेल्या नोटांनी भरलेल्या चार ते पाच पिशव्या आढळल्याचा संवादही ऐकू येत आहे. हा अहवाल हाती आल्यानंतर सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्या. शील नागू, हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जी. एस. संधवालिया आणि कर्नाटक उच्च न्यायालयाचे अनू शिवरमण यांचा समावेश असलेली समिती स्थापन केली. चौकशी पूर्ण करण्यासाठी समितीला कोणतीही मुदत आखून देण्यात आलेली नसली तरी हा दुसरा टप्पा महत्त्वाचा असल्याचे मानले जात आहे. २०१४ साली मध्य प्रदेशातील एका प्रकरणातही सर्वोच्च न्यायालयाने अशा पद्धतीने दुसऱ्या स्तरावरील चौकशी केली होती.

मला अडकविण्याचे कारस्थान – न्या. वर्मा

आपल्या निवासस्थानी रोख रक्कम सापडल्याच्या आरोपांचे न्या. यशवंत वर्मा यांनी खंडन केले असून, हे आपल्याला अडकविण्याचे आणि प्रतिमा मलीन करण्यासाठीचे कारस्थान असल्याचे म्हटले आहे. न्या. उपाध्याय यांच्या अहवालात या प्रतिसादाची नोंद आहे. न्या. वर्मा यांनी लेखी उत्तरात म्हटले आहे, की उच्च न्यायालयाच्या अतिथीगृहात मला प्रथम व्हिडीओ आणि छायाचित्रे दाखविण्यात आली. पोलीस आयुक्तांनी ती तुम्हाला (न्या. उपाध्याय) दाखविली आहेत. ते पाहून मला पूर्णपणे धक्का बसला. प्रसारमाध्यमांनी आरोप करण्यापूर्वी चौकशी करण्याची अपेक्षा होती. १४-१५ मार्चदरम्यान रात्री आग लागली त्या ठिकाणी निरुपयोगी फर्निचर, बाटल्या, काचेची भांडी, जुने स्पीकर, वापरलेले कारपेट ठेवण्यात आले होते. आपण किंवा आपल्या कुटुंबीयांनी कोणतीही रोख रक्कम स्टोअररूममध्ये कधीही ठेवली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

आम्ही पैशांचे व्यवहार बँकेच्या माध्यमातून आणि तपशिलाच्या सर्व नोंदींसह करतो. आम्ही सापडलेल्या नोटा हटविल्याचेही मी नाकारत आहे. आम्हाला जळालेल्या नोटांच्या बॅगा दाखविल्या गेल्या नाहीत किंवा त्या आमच्याकडे दिल्या गेल्या नाहीत. राडारोडा उचलण्यात आल्याचा दावा करण्यात येणारा भाग हा घराच्या एका कोपऱ्यात आहे. न्या. यशवंत वर्मा

●न्या. वर्मा यांच्या निवासस्थानी लागलेल्या आगीनंतर न्या. उपाध्याय यांच्या अहवालाबरोबरच अग्निशमन दलाच्या मोहिमेची ध्वनी-चित्रफीत सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर जारी करण्यात आली आहे. यातील काही दृष्यांमध्ये जळलेल्या अवस्थेतील नोटा दिसत आहेत.