पीटीआय, मैसुरू
कर्नाटकमध्ये १० मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेस उमेदवारांची दुसरी यादी ४ एप्रिल रोजी होणाऱ्या पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीनंतर जाहीर केली जाईल, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी रविवारी स्पष्ट केले. कोलार या दुसऱ्या मतदारसंघातून आपण निवडणूक लढवावी अथवा नाही याबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, याचा त्यांनी पुनरुच्चार केला.
काँग्रेसने १२४ उमेदवारांची पहिली यादी २५ मार्च रोजी जाहीर केली आहे. अजून १०० उमेदवारांची यादी जाहीर होणे बाकी आहे. काँग्रेसच्या कर्नाटक शाखेने दुसऱ्या यादीत ५२ विधानसभा मतदारसंघांसाठी उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत. त्यावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय निवडणूक समिती अंतिम निर्णय घेणार आहे.मैसुरू जिल्ह्यातील वरुणा हा सिद्धरामय्या यांचा मतदारसंघ आहे. आमदार यितद्र सिद्धरामय्या हे सिद्धरामय्यांच्या प्रचाराची काळजी घेतील. सिद्धरामय्या हे पक्षाच्या प्रचारासाठी राज्याचा दौरा करणार आहेत.