अयोध्येत २२ जानेवारी या दिवशी प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या सोहळ्याचा उत्साह देशभरात सुरु आहे. तसंच विविध प्रकारे तयारीही केली जाते आहे. राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी विविध मान्यवरांना, राजकारण्यांना निमंत्रणंही पाठवण्यात आलं आहे. राम मंदिराचा हा उद्घाटन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडणार आहे. अयोध्येत रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे, ती मूर्ती ठरल्याचं केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं आहे. त्याचप्रमाणे एक फोटोही त्यांनी पोस्ट केला आहे. ज्याची चर्चा होते आहे.
प्रसिद्ध मूर्तीकार योगीराज अरुण यांनी घडवली रामाची मूर्ती
अयोध्येतील मंदिरात जी रामाची मूर्ती असणार आहे ती प्रसिद्ध मूर्तीकार योगीराज अरुण यांनी घडवली आहे. अरुण योगीराज हे प्रसिद्ध मूर्तीकार आहेत. प्रसिद्ध मूर्तीकार योगीराज शिल्पी यांचे पुत्र आहेत. अरुण यांचे आजोबा वाडियार घराण्यातल्या महालांना सुंदर रुप द्यायचे. २००८ मध्ये अरुण यांनी एमबीए केलं. त्यांना मूर्तीकार व्हायचं नव्हतं. पण त्यांच्या आजोबांनी सांगितलं होतं की अरुण मूर्तीकार होईल. एका खासगी कंपनीत काम केल्यानंतर अरुण यांनी मूर्तीकाम करण्यास सुरुवात केली आणि त्यांच्या आजोबांनी सांगितल्याप्रमाणे प्रसिद्ध मूर्तीकार झाले.
समोर आलेल्या फोटोत काय?
ANI च्या वृत्तानुसार केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी रामाच्या मंदिरात प्राणप्रतिष्ठेसाठी मूर्ती ठरली असं म्हटलं आहे. “अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या अभिषेकासाठी मूर्तीची निवड निश्चित झाली आहे. आपल्या देशातील प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगी यांनी तयार केलेल्या रामाच्या मूर्तीची अयोध्येत स्थापना केली जाणार आहे.” असंही त्यांनी म्हटलं आहे. तसंच जो फोटो पोस्ट करण्यात आला आहे त्यात मूर्तीकार अरुण योगीराज रामाच्या मूर्तीसह दिसत आहेत. राम, लक्ष्मण आणि सीता तसंच त्यांच्या पायाशी हनुमान अशी ही मूर्ती आहे. या मूर्तीचं रुप अत्यंत देखणं आणि खास आहे.
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. मात्र या मूर्तीची राम मंदिरात प्रतिष्ठापना केली जाणार की नाही, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती मिळालेली नाही. अरुण योगीराजांच्या मूर्तीची केवळ निवड करण्यात आली आहे.
मूर्तीवर पडणार सूर्याची किरणे
राम मंदिराच्या गाभाऱ्यात रामलल्लाच्या दोन मूर्ती असतील. एक प्रभू श्रीरामाच्या बालपणातील रामलल्लाची असेल. तर दुसरी मूर्ती राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान अशी असेल. दरवर्षी रामनवमीच्या दिवशी दुपारी बारा वाजता सूर्याची किरणे श्रीरामाच्या मूर्तीवर पडतील अशा पद्धतीने मंदिराचे बांधकाम करण्यात येत आहे. यासाठी रुरकी आणि पुणे येथील संस्थांमधील शास्त्रज्ञांचे पथक कार्यरत आहे.