साध्वी प्रज्ञा सिंह यांनी केलेलं वक्तव्य चुकीचं आणि अयोग्य आहे. करकरे देशासाठी शहीद झाले आणि त्यांच्याबद्दल साध्वी प्रज्ञा जे बोलल्या ते निश्चितच निषेधार्ह आहे, असं मत भाजपाच्या नेत्या आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी व्यक्त केलं आहे. साध्वी प्रज्ञा जे बोलल्या ते चुकीचं आहे, त्यावर त्यांनी माफीही मागितली आहे. मात्र, मुळात त्यांनी असं बोलणंच चूक आहे असं त्यांनी म्हटलं आहे.
त्यांना उमेदवारीच का दिली असा प्रश्न विरोधकांकडून होतो आहे. याबाबत त्या म्हणाल्या, त्याबद्दलचा योग्य तो निर्णय निवडणूक आयोगाकडून घेतला जाईल. आम्ही जबाबदारी टाळली असा आरोप विरोधकांकडून होतो आहे. मात्र, तसं नाही साध्वी प्रज्ञा जे बोलल्या ते त्यांचं व्यक्तिगत मत आहे. भाजापाचा त्याच्याशी संबंध नाही. विरोधक काय म्हणत आहेत त्याला फारसं महत्त्व आम्ही देत नाही.
अंमळनेरमध्ये जी वादावादी झाली त्यावर विचारलं असता विजयाताई म्हणतात, अमळनेरमध्ये जे काही झालं तो आमच्यासाठी इतिहास आहे. आम्ही आता ते सारं विसरून कामाला लागलो आहोत. स्थानिक पातळीवर वाद झाले हे मान्य आहे. मात्र, आम्ही सगळेजण कामाला लागलो आहोत, आम्हाला स्मिता वाघ यांचीही साथ मिळाली आहे. उन्मेष पाटील हे जळगावातले आमचे उमेदवार आहेत त्यांना प्रचंड बहुमताने निवडून आणणं हे आमचं लक्ष्य आहे. त्यामुळे वादाचा मुद्दा संपला आहे. जळगावात स्थानिक पातळीवर काहीही वाद नाहीत असंही विजया रहाटकर यांनी म्हटलं आहे.