पीटीआय, किबिथू (अरुणाचल प्रदेश) : येथील लोहित खोऱ्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगतच्या सामरिकदृष्टय़ा महत्त्वाच्या किबिथू लष्करी छावणीला शनिवारी देशाचे पहिले सैन्यदलांचे प्रमुख (सीडीएस) जनरल बिपिन रावत यांचे नाव देण्यात आले. या गावाजवळून जाणाऱ्या महत्त्वाच्या मार्गावर ही छावणी आहे. सुमारे नऊ महिन्यांपूर्वी जनरल रावत यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृ्त्यू झाला होता. रावत हे प्रारंभी १९९९-२००० दरम्यान कर्नल असताना त्यांनी किबिथू येथे तैनात असलेल्या त्यांच्या गोरखा रायफल्सच्या बटालियन ५-११ चे नेतृत्व केले होते. या संवेदनशील क्षेत्रातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर या छावणीतले सैनिक लक्ष ठेवून असतात. भारतीय लष्कराच्या याच छावणीच्या अगदी विरुद्ध बाजूला चिनी सैन्याची रिमा चौकी आहे. लोहित खोऱ्यातील पर्वतराजीत किबिथू ही भारताची पूर्वेकडील अखेरची छावणी आहे. याच ठिकाणी मेयोर आणि जर्किन आदिवासींची छोटीशी वस्तीही आहे. मेशाई हे रस्त्याचे शेवटचे टोक १९९७ पर्यंत या भागाला जोडले गेले नव्हते. त्यामुळे तेथे हवाई मार्गानेच दळणवळण होत होते. लोहित नदीच्या पूर्व किनाऱ्यावर जाण्यासाठी केवळ एका दोरखंडाच्या पादचारी पुलाचा पर्याय होता. ही लष्करी छावणी आणि वालांग ते किबिथू हा २२ किलोमीटर लांबीचा रस्ता यांना आता जनरल रावत यांचे नाव देण्यात आले आहे. या नामकरण समारंभाला अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल ब्रिगेडिअर (निवृत्त) बी. डी. मिश्रा, मुख्यमंत्री प्रेमा खंडू, लष्कराचे पूर्व कमांडचे प्रमुख ले. जनरल राणा प्रताप कलिता आणि जनरल रावत यांच्या कन्या तारिनी या उपस्थित होत्या.
किबिथूबाबत.. किबिथूवर सर्वप्रथम २-आसाम रायफल्सने डिसेंबर १९५० मध्ये एक प्लॅटून फौजफाटय़ासह ताबा मिळविला होता. त्यानंतर १९५९ मध्ये तेथे आणखी एक प्लॅटून तैनात करण्यात आली. १९६२ च्या चिनी आक्रमणादरम्यान चीनला पहिला प्रतिकार किबिथू येथेच झाला. हे युद्ध संपल्यानंतर १९६४ मध्ये आसाम रायफल्सने या भागाचा पुन्हा ताबा मिळविला. १९८५ मध्ये तेथे ६-राजपूतकडे किबिथूची सूत्रे आली. जनरल रावत यांनी त्यांच्या कारकीर्दीत या छावणीत सुधारणा करून तेथे स्थानिकांशी नागरी-लष्करी संबंध प्रस्थापित केले आणि सीमा अधिकारी बैठकांची यंत्रणा सुस्थापित केली.