पीटीआय, नवी दिल्ली
घड्याळ चिन्हाचा मुद्दा न्यायप्रविष्ट असल्याबाबतची जाहिरात ३६ तासांत वृत्तपत्रांत द्या, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला दिले. न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या आदेशांमध्येही चिन्हाबरोबर प्रकरण न्याप्रविष्ट असल्याचा उल्लेख करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते.
न्यायमूर्ती सूर्यकांत, न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. उज्जल भुयान यांच्या खंडपीठापुढे घड्याळ चिन्हाच्या गैरवापराचा मुद्दा आला असता हे आदेश देण्यात आले. न्यायालयात शक्ती खर्च करण्यापेक्षा प्रचारावर लक्ष केंद्रित करा असा सल्लाही न्यायालयाने दोन्ही गटांना दिला. मराठीसह प्रमुख वृत्तपत्रांमध्ये ठळकपणे ३६ तासांत घड्याळ चिन्हाबाबत अस्वीकारण द्या असा आदेश अजित पवार गटातर्फे बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील बलबिर सिंह यांना खंडपीठाने दिला. उमेदवारी माघारीची मुदत संपली आहे अशा वेळी शरद पवार गट सर्व निवडणूक प्रक्रियेत व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप सिंह यांनी केला. त्याला शरद पवार गटाकडून अभिषेक मनू सिंघवी यांनी विरोध केला. घड्याळ हे चिन्ह ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी तीस वर्षे संबंधित आहे, विरोधक याचा दुरुपयोग करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा सिंघवी यांनी केला.