शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदे यांना देण्याचा निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाबरोबरच शिंदे गटावरही हल्ला चढवला आहे. आयोगाचा निर्णय अमान्य असून तो देणारा आयोग बरखास्त करावा, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. तर, उद्धव ठाकरेंच्या या मागणीला भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे भाजपाला एकप्रकारे घरचा आहेरच मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तर सुब्रमण्यम स्वामींच्या या पाठिंब्यानंतर आता ठाकरे गटाकडून प्रतिक्रिया आली आहे. ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांना यावर प्रतिक्रिया दिली आहे.
अनिल देसाई म्हणाले, “अर्थात आता सुब्रमण्यम स्वामी हे निष्णात अर्थतज्ज्ञ आहेत. बराच काळ त्यांनी भारतीय राजकारणात घालवलेला आहे. खरोखरच बऱ्याच विषयावर चांगला अभ्यास करून ते बोलणारे आहेत. त्यामुळे त्यांचही मत लक्षात घेतलं पाहिजे.”
हेही वाचा – निवडणूक आयोग बरखास्त करण्याच्या उद्धव ठाकरेंच्या मागणीला भाजपाच्या मोठ्या नेत्याचा पाठिंबा!
याचबरोबर, “त्यांच्याबरोबर कितीतरी कायदेतज्ज्ञ आहेत, ज्यांनी आपलं मत नोंदवलेलं आहे. मग या कायदेतज्ज्ञांनी कायद्याचा, घटनेचा अभ्यास केलेला नाही का?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
काय म्हणाले आहेत सुब्रमण्यम स्वामी?
”मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून हटवण्याच्या उद्धव ठाकरे यांच्या मागणीला माझा पाठिंबा आहे. कारण, त्यांचा कार्यकाळा अर्थमंत्रालयात संशायस्पद होता.” असं सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्वीटद्वारे म्हटलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपलाच पक्ष खरी शिवसेना असल्याचा करीत निवडणूक आयोगाकडे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्हाची मागणी केली होती. केंद्रीय निवडणूक आयोगाने गेल्याच आठवडय़ात शिंदे यांची मागणी मान्य करीत शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला बहाल करण्याचा आदेश दिला. त्यामुळे संतापलेल्या ठाकरे यांनी आज निवडणूक आयोगावर पक्षपातीचा आरोप केला. निवडणूक आयोगच बरखास्त करण्याची मागणी केली. पक्षाचे नाव आणि चिन्ह चोरणे हा विरोधकांचा पूर्वनियोजित कट असून अशीच परिस्थिती उद्या अन्य पक्षांवरही आणू शकतात. त्यामुळे सन २०२४ची लोकसभा निवडणूक ही देशातील कदाचित शेवटची निवडणूक ठरू शकते असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे.