पीटीआय, लंडन

ऑक्सफर्ड विद्यापीठाने बुधवारी नवीन कुलपतीपदाच्या शर्यतीतील ३८ अंतिम उमेदवारांची घोषणा केली. विशेष म्हणजे यामध्ये भारतीय वंशाच्या उमेदवारांचाही समावेश आहे. दरम्यान, या उमेदवारांमधून पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना वगळण्यात आले आहे.

कुलपतीपदाच्या शर्यतीतील बर्कशायरमधील ब्रॅकनेल फॉरेस्टचे पहिले भारतीय वंशाचे महापौर अंकुर शिव भंडारी, आंतरराष्ट्रीय उद्याोजकतेचे प्राध्यापक निर्पालसिंग पॉल भंगाल आणि वैद्याकीय व्यावसायिक प्रतीक तरवाडी आदींची राजकारणी, समाजसेवी आणि उद्याोजक यांच्याशी स्पर्धा होणार आहे. ‘हुजूर’ पक्षाचे माजी नेते लॉर्ड विल्यम हेग आणि माजी कामगार नेते लॉर्ड पीटर मँडेलसन आदी निवडलेल्या ज्येष्ठ राजकारण्यांपैकी आहेत. तर निवड प्रक्रियेनंतर इम्रान खान यांना अपात्र ठरवण्यात आले आहे.विद्यापीठाने जाहीर केलेल्या निवेदनात, निवडणूक समितीद्वारे केवळ विद्यापीठाच्या नियमांमध्ये नमूद केलेल्या चार निकषांवर अर्जांचा विचार केला जातो.