वृत्तसंस्था, नवी दिल्ली / वॉशिंग्टन
न्यूयॉर्कमधील एका शीख दहशतवाद्याच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी अमेरिकेने थेट भारताकडे बोट दाखविले आहे. निखिल गुप्ता या भारतीयाविरोधात आरोप निश्चित करण्यात आले असून त्याने एका भारतीय अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून हा कट रचल्याचा दावाही आरोपपत्रात करण्यात आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार हे प्रकरण खलिस्तानी फुटिरतावादी गुरपतवंतसिंग पन्नू याच्याशी संबंधित असून याच प्रकरणात चौकशी समिती स्थापन केल्याचे बुधवारी भारताच्या परराष्ट्र खात्याने जाहीर केले.
अमेरिकेच्या न्यायखात्याने मॅनहॅटन न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्राबाबत केंद्रीय सरकारी वकील डॅमियन विल्यम्स यांनी बुधवारी माहिती दिली. त्यानुसार निखिल गुप्ता याने भारत सरकारचा कर्मचारी असलेल्या व्यक्तीच्या मदतीने न्यूयॉर्कचा रहिवासी असलेल्या (पान ११ वर) (पान १ वरून) शिख फुटिरतावादी नेत्याच्या हत्येचा कट आखला होता. विल्यम्स यांनी खलिस्तानी फुटिरतावादी आणि कथित भारतीय अधिकाऱ्याचे नाव जाहीर केलेले नाही. गुप्ता याच्याविरोधात दोन आरोप ठेवण्यात आले असून तो सध्या झेक प्रजासत्ताक येथे अटकेत आहे. त्याचे अमेरिकेत हस्तांतरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
हेही वाचा >>>‘इंडिया’ महाआघाडीला पुढे घेऊन जाण्याची क्षमता खरगेंकडेच! काँग्रेसेतर नेत्यांचा सोनिया गांधींच्या उपस्थितीत निर्वाळा
‘फायनान्शियल टाईम्स’ या इंग्रजी वृत्तपत्राने गेल्या आठवड्यात अज्ञात स्त्रोतांचा हवाला देऊन पन्नूच्या हत्येच्या कटासंबंधी वृत्त दिले होते. पन्नू हा शीख फुटीरतावादी असून, खलिस्तान समर्थक आहे. त्याच्याकडे अमेरिका आणि कॅनडाचे नागरिकत्व आहे. भारतीय तपास यंत्रणांना विविध दहशतवादी कारवायांच्या आरोपाखाली तो हवा आहे.
अमेरिकेचा चौकशीसाठी दबाव?
‘वॉशिंग्टन पोस्ट’ने बुधवारी दिलेल्या वृत्तानुसार पन्नूच्या हत्येच्या कटाबाबत चौकशी सुरू करण्यासाठी अमेरिकेचे दोन अत्यंत वरिष्ठ अधिकारी दोनवेळा भारतात येऊन गेले. सीआयएचे संचालक विल्यम जे. बर्न्स तसेच राष्ट्रीय गुप्तहेर खात्याचे संचालक अवरिल हाईन्स या दोन अधिकाऱ्यांनी ऑगस्ट व ऑक्टोबरमध्ये नवी दिल्लीला भेट दिली होती. तसेच ‘जी-२०’ परिषदेनिमित्त सप्टेंबरमध्ये भारतात आले असताना खुद्द अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे हा विषय काढला होता, असे ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने म्हटले आहे.
आरोपपत्रात काय?
● भारतीय सरकारी कर्मचाऱ्याने निखिल गुप्ताला मे २०२३मध्ये फुटीरतावाद्याच्या हत्येचे काम सोपविले.
● गुप्ताने हल्लेखोर नेमण्यासाठी गुन्हेगारी वर्तुळातील एका व्यक्तीबरोबर संधान साधले.
● मात्र ही व्यक्ती अमेरिकेच्या अमलीपदार्थ विरोधी प्राधिकरणाचा (डीईए) हेर असल्यामुळे हत्येचा कट उघडकीस आला.
● कॅनडामध्ये हत्या झालेला हरदीपसिंग निज्जर हादेखील आपल्या ‘यादी’त असल्याचे हत्येच्या दुसऱ्या दिवशी गुप्ताने सदर डीईए हस्तकाला सांगितले होते.
केंद्राची चौकशी समिती
पन्नूच्या हत्येचा कट रचण्याच्या आरोपांबाबत चौकशीसाठी भारताने उच्चस्तरीय समिती स्थापन केल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी बुधवारी दिली. १८ नोव्हेंबर रोजी सर्व संबंधित पैलूंचा तपास करण्यासाठी उच्चस्तरीय तपास समिती स्थापन करण्यात आल्याचे ते म्हणाले.