नवी दिल्ली : G20 Summit Delhi 2023 करोना महासाथीमुळे जगभरातीत देशांना एकमेकांबद्दल वाटणारा विश्वास कमी झाला आणि युक्रेन युद्धामुळे ही दरी वाढल्याचे जाणवते. करोनासारख्या आपत्तीवर आपण यशस्वीपणे मात केली असून अविश्वासाच्या या संकटावरही जग मात करू शकते. देशा-देशांमध्ये पुन्हा एकदा विश्वासाचे वातावरण निर्माण करून पुढे गेले पाहिजे, असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी-२० समूहातील राष्ट्रप्रमुखांच्या शिखर परिषदेच्या उद्घाटन सत्रातील भाषणाद्वारे दिला. ‘जी-२०’ समूहाच्या शिखर परिषदेला शनिवारी दिल्लीतील प्रगती मैदानावरील ‘भारत मंडपम’मध्ये सुरुवात झाली.
या परिषदेला चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन उपस्थित राहिले नाहीत. युक्रेनच्या युद्धावरून ‘जी-२०’ देशांमध्ये मतभेद पुन्हा ऐरणीवर आले आहेत. पंतप्रधान मोदींनी चीन व रशियाचा थेट उल्लेख केला नसला तरी, युक्रेन युद्धामुळे जगभरात अविश्वासाच्या वातावरणात अधिक भर पडली, असे मोदी म्हणाले. जगभरात एकमेकांबद्दल कमी झालेल्या विश्वासाच्या समस्येवर विजय मिळवायचा असेल तर, सब का साथ, सब का विकास, सब का विश्वास, सब का प्रयास, हा भारताचा मंत्र अवघ्या जगासाठी मार्गदर्शक ठरू शकेल, असा सल्ला मोदींनी दिला. ‘जी-२०’ समूहाचा अध्यक्ष या नात्याने मी जगाला आवाहन करू इच्छितो की, अविश्वासाचे वातावरण दूर करून एकमेकांवर पुन्हा भरवसा दाखवावा. आता आपण एकमेकांना साह्य करून एकत्रितपणे पुढे जाण्याचा हा काळ आहे, असे मोदी म्हणाले.
हेही वाचा >>> G20 Summit 2023: चीनकडून आर्थिक जागतिकीकरणासाठी सहकार्याची हाक
जगातील जुने प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी आता नव्या पर्यायांचा विचार केला पाहिजे. त्यामुळे मानव केंद्रीत दृष्टिकोन ठेवून विकास साधण्याची गरज आहे, असा विचार मोदींनी बोलून दाखवला. वैश्विक अर्थव्यवस्थेमध्ये उलथापालथ होत असेल, उत्तर व दक्षिणेकडील देशांमधील दरी वाढत असेल, पूर्वेकडील देश व पाश्चिमात्य देशांमधील दरी रुंदावत असेल वा ऊर्जा व खतांच्या व्यवस्थापनामध्ये अडचण येत असेल, दहशतवाद व सायबर सुरक्षेसंबंधी गंभीर समस्या उभ्या राहत असतील तर, अशा आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नवे उपाय शोधावे लागतील. वर्तमानातच नव्हे तर, भविष्यातील समस्यांचे निराकारण करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्याच लागतील, असा मुद्दा मोदींनी मांडला.
भारताचे ‘जी-२०’चे यजमानपद देशांतर्गत तसेच, देशाबाहेरही ‘सब का साथ विकास’ या मंत्राचे (सर्वसमावेशक) प्रतीक बनले. भारतात ‘जी-२०’ समूहाची परिषद जनभागीदारीतील ‘जी-२०’ परिषद बनली. देशातील ६० अधिक शहरांमध्ये २००हून अधिक बैठका झाल्या. त्याद्वारे देशातील कोटय़वधी जनता या परिषदेशी जोडली गेली, असे मोदींनी सांगितले. भारताच्या दोन हजार वर्षांपूर्वीच्या इतिहासाचा दाखला मोदींनी दिला. आपण सगळे जिथे बसलो आहोत, तिथून काही अंतरावरील स्तंभावर मानवतेच्या कल्याणाचा संदेश लिहिलेला आहे. अडीच हजार वर्षांपूर्वी भारताच्या भूमीने हा मानवी कल्याण व सुखाचा संदेश जगाला दिलेला होता. हा संदेश मनात रुजवून आपण जी-२० समूहाच्या शिखर परिषदेला सुरुवात करू, असे मोदी म्हणाले.
‘इंडिया’ऐवजी ‘भारत’!
- भारत मंडपममध्ये शनिवारी जी-२० समूहाच्या शिखर परिषदेला सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ४० हून अधिक राष्ट्रप्रमुखांचे स्वागत केले. गोलमेज परिषदेमध्ये ‘इंडिया’ऐवजी ‘भारता’चे अस्तित्व प्रस्थापित केले गेले.
- पंतप्रधान मोदींच्या आसनासमोर ‘भारत’ अशी पाटी ठेवण्यात आली होती. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिल्यांदाच केंद्र सरकारने अधिकृतपणे देशाचे ‘इंडिया’ नाव वगळून ‘भारता’चा स्वीकार केल्याचे स्पष्ट झाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिवारी रात्री जी-२० समूहातील राष्ट्रप्रमुखांसाठी भोजनाचे आयोजिन केले होते.
- राष्ट्रपती भवनातून निमंत्रितांना पाठवलेल्या आमंत्रणपत्रिकेवर ‘प्रेसिडेंट ऑफ इंडिया’ असा उल्लेख न करता प्रेसिडेंट ऑफ भारत असा नामोल्लेख केला होता. त्यावरून विरोधकांनी केंद्र सरकारवर तीव्र टीका केली असली तरी, जी-२० समूहाच्या बैठकीत ‘भारत’ हा उल्लेख केला गेल्यामुळे केंद्र सरकारने देशाच्या नामोल्लेखाबाबत ठोस निर्णय घेतल्याचेही स्पष्ट झाले.
- संसदेच्या विशेष अधिवेशनामध्ये यासंदर्भातील घटनादुरुस्ती विधेयक आणले जाणार असल्याची चर्चा होत आहे. संविधानाच्या अनुच्छेद १ मध्ये ‘इंडिया दॅट इज भारत’ असा उल्लेख केला असून त्यातील इंडिया हा शब्दप्रयोग वगळण्यासाठी घटनादुरुस्ती करावी लागणार आहे.