या २०३० सालापर्यंत जगातील मध्यमवर्गाची लोकसंख्या तब्बल ५ अब्जवर जाणार असून त्यामुळे २१ व्या शतकात अन्नधान्य टंचाई तसेच ऊर्जाटंचाईचे संकट अधिकच गहिरे होईल, असा निष्कर्ष ब्रिटन सरकारचे माजी विज्ञानविषयक सल्लागार डेव्हिड किंग यांनी बेंगॉल चेम्बर ऑफ कॉमर्समध्ये व्याख्यान देताना मांडला आहे.
मध्यमवर्गाच्या या लोकसंख्यावाढीत आशिया-प्रशांत क्षेत्राचा वाटा सर्वात मोठा असेल, असेही किंग यांनी नमूूद केले आहे. मध्यमवर्गाचे प्रमाण वाढल्याने बाजारपेठेतील मागणीही वाढेल. त्यातून अन्नधान्यटंचाई आणि ऊर्जेची गरज प्रमाणाबाहेर वाढेल. त्यावर मात करण्यासाठी अभिनव तांत्रिक व वैज्ञानिक उपाय शोधले पाहिजेत, असे किंग यांनी सांगितले. जगातील अन्नधान्य टंचाईवर मात करण्यासाठी भारत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. अन्नधान्याची वाढती मागणी पूर्ण करता यावी यासाठी भारताने दुसऱ्या हरित क्रांतीला चालना दिली पाहिजे, असेही ते म्हणाले.

Story img Loader