संसदेच्या केंद्रीय सभागृहात राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या पहिल्या अभिभाषणाने संसदेच्या महत्त्वपूर्ण अधिवेशनाची सुरुवात होणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वीचे शेवटचे रेल्वे व सर्वसाधारण अर्थसंकल्प मांडण्याची सरकारला संधी मिळणार असल्यामुळे हे अधिवेशन महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
हिंदू दहशतवादाच्या मुद्दय़ावर केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिलगिरी व्यक्त केल्याने सरकारला कोंडीत धरण्याचा एक महत्त्वाचा मुद्दा गळाला असला, तरी हेलिकॉप्टर घोटाळा, महागाई, महिला सुरक्षेसाठी काढलेला अध्यादेश, भूसंपादन विधेयक, दुष्काळ, ओला दुष्काळ, मार्कंडेय काटजू यांचा लेख असा भरपूर दारूगोळा भाजपच्या हाती आहे. या मुद्यांवर सरकारची कोंडी करण्याची रणनीती बुधवारी सायंकाळी भाजप-रालोआच्या बैठकीत संसदेच्या अधिवेशनादरम्यान आखण्यात आली. संसदेच्या अधिवेशनात बरेच महत्त्वाचे कामकाज होणार असून हे सत्र व्यवस्थित चालेल असा विश्वास पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी व्यक्त केला. भाजपने बुधवारी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला जंतरमंतर येथे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली शिंदे यांच्या विरोधात धरणे आंदोलन केले. हिंदूू दहशतवादावर आपले विधान मागे घेऊन सुशीलकुमार शिंदे माफी मागत नाही तोपर्यंत संसदेचे अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा त्यावेळी देण्यात आला होता.

Story img Loader