देशाऐवजी मी जर फक्त व्यवसायाचा विचार केला असता तर मी आज एलॉन मस्कपेक्षा जास्त श्रीमंत व्यावसायिक झालो असतो असं वक्तव्य योगगुरू रामदेवबाबांनी केलं आहे. मला जे ज्ञान वेद, पुराण, रामायण, महाभारत, भगवद्गीता आणि पूर्वजांकडून मिळालं आहे त्यामध्ये ज्या गोष्टी समजल्या, ज्या गोष्टी शिकलो त्याच अंगिकारल्या. मी या सगळ्या गोष्टींचं पेटेंट करून घेतलं असतं तर आज एलॉन मस्कपेक्षा जास्त श्रीमंत असतो असं रामदेवबाबांनी म्हटलं आहे. साहित्य आजतक या मंचावर रामदेवबाबांनी हे वक्तव्य केलं आहे.
बाबा रामदेव यांनी आपल्या जुन्या एका वक्तव्याचा संदर्भ दिला आणि म्हणाले की मी एकदा सांगितलं होतं की माझा वेळ ही टाटा, बिर्ला, अदाणी, झुकरबर्ग, एलॉन मस्क, वॉरेन बफेट आणि बिल गेट्स यांच्यापेक्षा श्रीमंत असतो असं योगगुरू रामदेव बाबांनी म्हटलं आहे.
एलॉन मस्कचा उल्लेख रामदेवबाबा असंही म्हणाले की त्याने हे सांगितलं होतं की मी अशी कार तयार करेन, आकाशात तुमच्यासाठी जागा आरक्षित करेन. एलॉन मस्क टेक्नॉलॉजीच्या गोष्टी करतो. मात्र आपल्याकडे जो वेद, पुराण, धार्मिक पुस्तकं आणि पूर्वजांनी दिलेला ज्ञानाचा वारसा आहे तो जर मी पेटंटसाठी वापरला असता तर एलॉन मस्कपेक्षा मी श्रीमंत झालो असतो. मात्र आपल्याकडे असलेल्या ज्ञानाचा उपयोग जगाच्या कल्याणासाठी केला पाहिजे ही आपली शिकवण आहे असंही रामदेवबाबांनी म्हटलं आहे.
बाबा रामदेव यांनी हा दावा केला आहे मी आत्तापर्यंत अनेक गंभीर आजार असलेल्या रूग्णांना बरं केलं आहे. मेडिकल माफिया एकीकडे, दुसरीकडे पॉलिटिकल माफिया, धार्मिक माफिया आहेत पण मी कधीही माध्यमांना माफिया म्हटलं नाही. शुगरचे रूग्ण बरे होत नाहीत असा दावा करण्यात येतो मात्र आम्ही अशा रूग्णांनाही बरं केलं ज्यांना १००-२०० युनिट इन्शुलिन घ्यावं लागत होतं. रक्तदाब, थायरॉईड, लीव्हर, किडनी ट्रान्सप्लांट यापासूनही आम्ही लोकांना वाचवलं असंही रामदेवबाबांनी म्हटलं आहे.