लवकरच अहमदाबादमधील एलजी महाविद्यालयाचे नाव बदलून ‘नरेंद्र मोदी मेडिकल कॉलेज’ असे ठेवण्यात येणार आहे. अहमदाबाद महानगर पालिकेच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. मात्र यावरून आता विरोधकांनी नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. हे पहिल्यांदाच नाही की एखाद्या संस्थेला किंवा जागेला नरेंद्र मोदी यांचे नाव देण्यात आले आहे. यापूर्वी अहमदाबाद स्टेडियमचे नावही ‘नरेंद्र मोदी स्टेडिअम’ असे ठेवण्यात आले होते. या स्टेडियमचे नाव आधी ‘सरदार पटेल स्टेडियम’ असे ठेवण्यात आले होते.

दरम्यान, या घटनेनंतर तेलंगणा राष्ट्र समितीचे अध्यक्ष आणि उद्योगमंत्री केटी रामा राव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. त्यांनी एका ट्वीटच्या माध्यमातून या दोघांना लक्ष्य केले आहे. त्यांनी म्हटलंय, निर्मला सीतारामन यांना शक्य झालं तर त्या भारतीय रिझर्व्ह बँकेला, नोटांवरही महात्मा गांधीजींच्या फोटोच्या जागी नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्याचे आदेश देतील.

हेही वाचा : “शिंदेंनी शिवसेनेसोबतच महाराष्ट्राशी गद्दारी केली आणि फडणवीसांनी केंद्रातील भाजप सरकारला ‘रिटर्न गिफ्ट’ दिले”

केटी रामा राव यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय, “अहमदाबादमधील एलजी महाविद्यालयाचे नाव बदलून ‘नरेंद्र मोदी मेडिकल कॉलेज’ असे ठेवण्यात आले आहे. याआधी सरदार पटेल स्टेडियमचे नाव बदलून ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ ठेवण्यात आले होते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना शक्य झालं तर त्या लवकरच भारतीय रिझर्व्ह बँकेला आदेश देऊन नवीन नोटांवर महात्मा गांधीजींच्या फोटोच्या जागी नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यास सांगतील.”

दरम्यान, या मेडिकल कॉलेजची स्थापना २००९ साली झाली. त्या काळात येथे एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी एकूण १५० जागा होत्या. आता या महाविद्यालयात एमबीबीएससाठी २०० आणि एमडी किंवा एमएस अभ्यासक्रमासाठी एकूण १७० जागा आहेत. या मेडिकल कॉलेजच्या कार्यकारी समितीच्या बैठकीमध्ये महाविद्यालयाचे नाव बदलून ‘नरेंद्र मोदी मेडिकल कॉलेज’ असे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. गुरुवारी हा प्रस्ताव सादर करण्यात आला आणि तो मंजूरही झाला. एलजी महाविद्यालय हे मणिनगर भागामध्ये येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा ते तीनवेळा या क्षेत्रातून आमदार म्हणून निवडून आले आहेत.

Story img Loader