जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. आज सकाळपासून सत्यपाल मलिक ट्विटरवरही ट्रेडिंग आहेत. त्यांच्या ४० सेकंदाच्या व्हिडीओतून त्यांनी नरेंद्र मोदी सरकारवर टीका केली आहे. यामध्ये त्यांनी राम मंदिराचाही उल्लेख केला आहे.
ट्विटरवर ट्रेंड होणारा हा व्हिडीओ ज्येष्ठ वकिल प्रशांत भूषण यांनी शेअर केला आहे. काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी किती भयंकर गोष्ट सांगितली आहे, असं प्रशांत भूषण म्हणाले आहेत.
सत्यपाल मलिक काय म्हणाले आहेत?
४० सेकंदाच्या व्हिडीओमध्ये सत्यपाल मलिक यांनी मोदी सरकारवर टीकास्र डागलं आहे. “मला भिती याची आहे की कोणी काही खोडसाळपणा करेल. जसं की राम मंदिरावर हल्ला करतील, भाजपाच्या मोठ्या नेत्याला मारतील. ते अशी कामं करू शकतात. जे पुलवामा घडवू शकतात ते काहीही करू शकतात. त्यांना संसदेची अजिबात पर्वा नाहीय. ते चुकीच्या रस्त्यावर आहेत. त्यामुळे त्यांनी आताच निघून जावं. हरल्यानंतर जाणं चांगलं दिसेल का? मी खात्री देतो की, २०२४ मध्ये हे जिंकणार नाही”, असं सत्यपाल मलिक व्हिडीओमध्ये म्हणाले आहेत.
हेही वाचा >> मोदी यांना भ्रष्टाचाराचा तिटकारा नाही!, माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या मुलाखतीने खळबळ
“मोदी २०२४ मध्ये पंतप्रधान पद टिकवण्यासाठी काय करू शकतात याबाबत मोदींचे एकेकाळी निकटवर्तीय राहिलेल्या आणि जम्मू-काश्मीर व गोव्याचे गव्हर्नर पद भूषविलेल्या सत्यपाल मालिकांचे खळबळजनक दावे!”, असं ट्वीट महाराष्ट्र काँग्रेस या अधिकृत ट्विटर पेजवरून करण्यात आलं आहे.
भाजपावर याआधीही केली होती टीका
‘पंतप्रधानांना देशातील भ्रष्टाचाराबद्दल तितकासा तिटकारा नाही, असता तर गोव्यात मुख्यमंत्र्यांच्या भ्रष्टाचाराविषयी मी आवाज उठवल्यानंतर तातडीने माझी बदली झाली नसती ’.. ‘अदानी प्रकरण भाजपलाच गिळंकृत करेल’.. ‘पुलवामामध्ये जवानांवर विनाशकारी हल्ला झाला यामागेच आपलीच- केंद्रीय गृहमंत्रालयाची- चूक होती’ .. ‘जम्मू काश्मीरचे विभाजन करण्याचा निर्णय चुकीचा असूनही मोदी बेफिकीर होते.. त्यांच्याकडे अपुरी वा चुकीची माहिती असते, पण ते स्वत:च्या दुनियेत मस्त राहतात..’ अशी अनेक खळबळजनक विधाने जम्मू-काश्मीरचे अखेरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी ‘द वायर’ या डिजिटल नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये केली होती.