पीटीआय, नवी दिल्ली

‘बांगलादेशमधील अल्पसंख्याकांवरील अत्याचाराची वृत्ते अतिशयोक्त आहेत. अल्पसंख्याकांवर असे हल्ले झालेले नाहीत,’ असा दावा बांगलादेश सीमा सुरक्षा दलाचे (बीजीबी) महासंचालक मेजर जनरल महंमद अश्रफुझ्झमान सिद्दिकी यांनी केला आहे. भारताच्या सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) महासंचालक दलजीतसिंह चौधरी यांच्याबरोबर संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

भारत आणि बांगलादेशमधील सीमा सुरक्षा दलाच्या महासंचालकांमध्ये दर दोन वर्षांनी चर्चा होते. चर्चेची ही ५५वी फेरी आहे. ‘बीएसएफ’ आणि ‘बीजीबी’ प्रमुखांमध्ये उच्च स्तरावर झालेल्या चर्चेमध्ये इतरही अनेक मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे सिद्दिकी म्हणाले. बांगलादेशमध्ये सत्तांतर झाल्यानंतरची उच्च स्तरावरील ही पहिली चर्चा होती. ‘बांगलादेशमधील प्रशासनाने अल्पसंख्याकांचे रक्षण करण्यासाठी पावले उचलली.

आंतरराष्ट्रीय सीमेपासून ८ किलोमीटर अंतरापर्यंत आमच्या हद्दीत सुरक्षा दलाने दुर्गा पूजा मंडळांना सुरक्षा पुरविली. अल्पसंख्याकांवरील हल्ल्याची वृत्ते अतिशयोक्त होती आणि प्रत्यक्षात असे हल्ले झालेलेच नाहीत. अशी वृत्ते अधिक करून माध्यमांमध्येच आली. अल्पसंख्याकांवर हल्ले झाले नसल्याचे उदाहरण म्हणजे नुकताच सुरळीत पार पडलेला दुर्गा पूजा महोत्सव आहे,’ असा दावा सिद्दिकी यांनी केला. तसेच, भारताकडून बांगलादेश सीमेवर कुंपण उभारले जात असून, त्यावर सिद्दिकी यांनी आक्षेप नोंदवला. सीमेपासून १५० यार्ड निर्लष्करी भूमी असते. तेथे काम करण्यापूर्वी संयुक्त पाहणी व्हावी, अशी विनंती त्यांनी केली.

भारत-बांगलादेश सीमा करार १९७५ मध्ये झाला. त्यामध्ये कुठलाही बदल करण्यावर चर्चा झाली नसल्याचे सिद्दिकी यांनी सांगितले.

Story img Loader