दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाला बाहेरून पाठिंबा देण्याच्या कॉंग्रेसचा निर्णय चुकीचा आहे, असे पक्षातील काही नेत्यांना वाटत होते, असे पक्षाचे सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी मंगळवारी सांगितले. दिल्लीमध्ये जनतेचा कौल हा कॉंग्रेसच्या विरोधात आहे. त्यामुळे पक्षाने विधीमंडळात विरोधात बसून जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करायला हवे, असे काही नेत्यांना वाटत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, पक्षाने आम आदमी पक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेऊन मधला मार्ग स्वीकारला असल्याचे त्यांनी सांगितले.
दिल्लीमध्ये त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्यानंतर कॉंग्रेसने नव्यानेच उदयाला आलेल्या आम आदमी पक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय़ जाहीर केला होता. आम आदमीने पाठिंबा घेण्यासाठी घातलेल्या १६ अटी मान्य करीत कॉंग्रेसने त्यांना पाठिंबा देण्याचे जाहीर केले होते. मात्र, आम आदमी पक्षाला पाठिंबा देण्यावरून पक्षामध्ये दोन गट पडल्याचे चित्र दिसत होते. द्विवेदी यांच्या वक्तव्यामुळे त्याला दुजोरा मिळाला आहे. आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल लवकरच दिल्लीतील रामलीला मैदानावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.