गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यामुळे भाजप आणि जनता दल युनायटेड यांच्यात उद्भवलेल्या पराकोटीच्या संघर्षांला आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी विराम देण्याचा प्रयत्न केला. जदयुशी युती संपुष्टात आणण्याच्या वृत्ताचा ठामपणे इन्कार करताना राजनाथ सिंह यांनी उभय पक्षांमधील मतभेद एकत्र बसून सोडविले जातील, असा विश्वास व्यक्त केला.
आगामी लोकसभा निवडणुकीत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार होण्याच्या शक्यतेमुळे भाजप आणि जदयु यांच्यात कमालीची तेढ निर्माण झाली आहे. मोदींच्या नेतृत्वाला जदयुने तीव्र विरोध केला असून त्यामुळे कर्नाटकातील  विधानसभा निवडणूक संपल्यानंतर भाजप बिहारमध्ये जदयुशी असलेली सत्तेतील भागीदारी संपुष्टात आणेल, अशी चर्चा सुरू झाली होती, पण आज राजनाथ सिंह यांनी येथे पत्रकारांशी बोलताना ही शक्यता फेटाळून लावली. उभय पक्ष एकत्र बसून मतभेदांवर चर्चा करेल, असे ते म्हणाले. मोदी यांच्या नेतृत्वाच्या मुद्दय़ावरून भाजप आणि जदयु यांच्यात गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चिखलफेक सुरू आहे, पण बिहारमध्ये भाजप-जदयु युती तुटण्यात त्याचे पर्यवसान होणार नाही, असे संकेत राजनाथ सिंह यांनी दिले.
नरेंद्र मोदी हे आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपचे स्टार प्रचारक असतील, असेही राजनाथ सिंह यांनी सांगितले. कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर मोदी भाजपच्या निवडणूक प्रचार समितीची धुरा सांभाळतील, असे म्हटले जात असले तरी मोदी कर्नाटक विधानसभा निवडणुकीतही प्रचार करतील, असे राजनाथ सिंह यांनी इशाऱ्या-इशाऱ्यात सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा