ईडी आणि सीबीआय किंवा इतर तपास यंत्रणांचा वापर भाजपाकडून आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून केला जातो आहे असा आरोप विरोधकांनी कायमच केला आहे. मात्र वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काहीही चुकीचं वागत नाहीत असं म्हटलं आहे. एवढंच काय मी त्यांच्या जागी असतो तरीही असंच वागलो असतो. कायद्याच्या चौकटीत राहून जे करायचं तेच मोदी करत आहेत.मी नरेंद्र मोदींच्या जागी असतो तरीही हेच केलं असतं असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत प्रकाश आंबेडकर यांनी हे वक्तव्य केलं आहे.
नेमकं काय म्हटलं आहे प्रकाश आंबेडकर यांनी?
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सीबीआय, आयकर विभाग, ईडी यांचा गैरवापर करत आहेत असं मला वाटत नाही. ते जे काही करत आहेत ते कायद्याच्या चौकटीत राहून करत आहेत. सत्ता राखण्यासाठी त्यांना जे आवश्यक आहे ते सगळं पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. त्यांच्या जागी मी असतो, म्हणजेच जर मी नरेंद्र मोदी असतो तर मी देखील हेच केलं असतं जे पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांची खुर्ची हवीच आहे. कायदेशीर मार्गाने ती वाचवणं यात काहीही चुकीचं नाही. याआधीच्या सरकारांमध्येही अशा प्रकारच्या कारवाया झाल्या आहेत. कुणीही सत्ता राखण्यासाठी तेच करतं जे आत्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
संघ आणि भाजपाकडे या प्रश्नाचं उत्तर आहे का?
सामान्य माणसांनी एक गोष्ट लक्षात घेतलं पाहिजे की २०१२ पासून काही षडयंत्रं सुरू आहेत. पक्षांमध्ये भांडणं लावली जात आहेत असं माझं निरीक्षण आहे. एक लक्षात घ्या माणसाचा भरवसा नसतो. भाजपा किंवा संघाने या प्रश्नाचं उत्तर द्यावं. माझी इच्छा नाही की असं व्हावं पण उदाहरण म्हणून घ्या की उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्या काही झालं? तर पुढचा पंतप्रधान कोण असेल हे सांगतील का? त्यांना सांगता येणार नाही. अशात आमच्याकडे विचाराल की पंतप्रधान पदाचा चेहरा कोण? आमच्याकडेही कुणालाही सांगता येणार नाही.
मला भाजपासोबत जाण्याचा मोह झाला तर कुणीही अडवू शकत नाही
मला उद्या भाजपासोबत जाण्याचा मोह झाला तर मी जाऊ शकतो. एक तर माझा पक्ष मला अडवू शकतो किंवा माझे कुटुंबीय मला अडवू शकतात. तिसरी अशी कुणीच व्यक्ती नाही असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
प्रकाश आंबेडकर आणि शरद पवारांच्या ‘त्या’ विधानांवरून भाजपाचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; म्हणाले…
भाजपाकडून जे राजकारण केलं जातं आहे त्यात चुकीचं काहीच नाही
एक लक्षात घ्या भाजपाला ती प्रत्येक संधी हवी आहे ज्या ठिकाणी त्यांना फूट पाडता येईल. भाजपाकडून जे काही केलं जातं आहे ते काही चुकीचं नाही. राजकीय खेळाचा तो एक भाग आहे. मी गेली ४० वर्षे राजकारणात आहे. मी पाहात आलो आहे की सत्ता आली की सत्तेवर येणारा पक्ष असंच वागत असतो. राजकारणात किंतू-परंतू यांना काहीही अर्थ नसतो. असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. विरोधक एकत्र आले तर ते खुर्चीखाली आग लावतील हे सत्य आहे. मग पंतप्रधान म्हणून मी हे का करू देऊ? विरोधकांना दूर ठेवण्याचा त्यांच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न मोदींकडून केला जातो आहे. मला यात काहीही चुकीचं वाटत नाही असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. तसंच मी माझी प्रांजळ मतं मांडतच राहणार असंही त्यांनी म्हटलं आहे.