काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी भारतीय जनता पार्टीवर निशाणा साधला आहे. २०१६ मध्ये भारताने पाकिस्तानातील उरी येथे सर्जिकल स्ट्राइक केला होता, पण याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही, अशी टीका दिग्विजय सिंह यांनी सोमवारी केली. “केंद्र सरकारने सांगितलं की, त्यांनी अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केला. पण याचा एकही पुरावा उपलब्ध नाही. भाजपा हा खोटेपणावर आधारलेला पक्ष आहे, असंही सिंह म्हणाले. ते जम्मू येथील एका कार्यक्रमात बोलत होते.
दरम्यान, त्यांनी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरूनही केंद्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. २०१९ मध्ये पुलवामा येथे भारतीय सैन्यावर हल्ला झाला होता. यामध्ये ४४ सीआरपीएफ जवानांचा मृत्यू झाला होता.
हेही वाचा- राजस्थानात काँग्रेसची अंतर्गत खदखद कायम; गेहलोत-पायलट वादाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात उमटणार पडसाद?
एक व्हिडीओ जारी करत दिग्विजय सिंह म्हणाले, “पुलवामा हल्ल्यात दहशतवाद्यांकडे ३०० किलो आरडीएक्स कुठून आले? यावेळी दहशतवाद्यांसोबत डीएसपी देवेंद्रसिंग पकडला गेला होता. पण त्याची सुटका कशी आणि का झाली? भारताच्या पंतप्रधानांचं पाकिस्तानशी असलेल्या मैत्रीबद्दलही आम्हालाही जाणून घ्यायचं आहे,” अशी टीका दिग्विजय सिंह यांनी केली.
दिग्विजय सिंह यांच्या टीकेनंतर भाजपाचे प्रवक्ते गौरव भाटीया यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “बेजबाबदार वक्तव्य करणं ही काँग्रेस पक्षाची सवय आहे. भारतीय सुरक्षा दलाविरोधात बोललेलं कुणीही सहन करणार नाही. नरेंद्र मोदी यांच्याबद्दल मनात द्वेष असल्याने राहुल गांधी आणि दिग्विजय सिंह यांच्यात राष्ट्रप्रेम शिल्लक राहिलं नाही,” अशी टीका भाटीया यांनी केली.