भारतीय जनता पक्षामध्ये पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी कोणतीही स्पर्धा नसून, याबाबत अंतिम निर्णय पक्षाचे संसदीय मंडळच घेईल, असे पक्षाध्यक्ष राजनाथसिंह यांनी स्पष्ट केले. अमेरिकेच्या दौऱयावर असलेल्या राजनाथसिंह यांनी तेथील पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना राजनाथसिंह यांनी ही भूमिका मांडली.
ते म्हणाले, मुख्यमंत्रीपदाचा किंवा पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून कोणाला जाहीर करायचे, हे ठरविण्यासाठी भाजपमध्ये एक पद्धत आहे. हा निर्णय पूर्णपणे पक्षाचे संसदीय मंडळ घेते. मी जरी संसदीय मंडळाचा अध्यक्ष असलो, तरी हा निर्णय सर्व सदस्य एकमताने घेतात.
नरेंद्र मोदी हे सध्या देशातील सर्वांत लोकप्रिय नेते आहेत. तरीही त्यांना पंतप्रधानपदाची उमेदवारी देण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही. योग्यवेळी मी संसदीय मंडळाची बैठक बोलावेन आणि त्याच बैठकीत पंतप्रधानपदाचा उमेदवार आम्ही एकमताने ठरवू, असेही राजनाथसिंह यांनी सांगितले.