कोणत्याही एका विशिष्ट घटनेचा उल्लेख न करता देशात काही प्रमाणात असहिष्णुता अस्तित्वात असल्याचे धाडसी विधान संसदीय कामकाज मंत्री वैंकय्या नायडू यांनी सोमवारी राज्यसभेत झालेल्या चर्चेत केले. मात्र, या असहिष्णुतेविषयी ढोबळपणे भाष्य करण्यापेक्षा या असहिष्णुतेचा ठामपणे सामना केला पाहिजे. तसंच अवाजवी विधाने करणाऱ्या व्यक्तींचा निषेध करून त्यांच्याशी फारकत घेतली पाहिजे, असंही ते यावेळी म्हणाले.
समाजातील विविध स्तरांमध्ये थोडीफार असहिष्णुता आहे. तिचा शोध घेऊन ती स्थानिक स्तरावरच मर्यादित ठेवली पाहिजे आणि या असहिष्णुतेचा ठामपणे सामना केला पाहिजे. त्याऐवजी आपण ही असहिष्णुता सरसकट सर्वांना लागू करतो, असे नायडू यांनी सांगितले. देशभरात दलित आणि लेखकांवर झालेल्या हल्ल्यांच्या घटनांसंदर्भात बोलताना ते म्हणाले की, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर एका रात्रीत या घटना घडलेल्या नाहीत. त्या घडतच आहेत. यावेळी नायडू यांनी सलमान रश्दी यांच्या ‘दि सॅटानिक व्हर्सेस’ या वादग्रस्त पुस्तकावर बंदी घालण्याच्या पी. चिदंबरम यांच्या विधानाचे समर्थनही केले.
सर्वप्रथम आपण एकमेकांबरोबर सहिष्णुतेने वागू त्यानंतर जनमताविषयी सहिष्णुता दाखवू. जनमताचा आदर करणे हीच सर्वात मोठी सहिष्णुता असल्याचे यावेळी वैंकय्या नायडू यांनी म्हटले. यावेळी नायडू यांनी बिहारमध्ये जनतेने नितीशकुमार आणि लालू प्रसाद यांच्या बाजूने दिलेल्या निकालाचा उल्लेख केला. लोकांनी दिलेल्या या जनमताचा आदर करण्याशिवाय आपल्याकडे अन्य कोणताही पर्याय नसल्याचेही नायडू यांनी सांगितले.

Story img Loader