माणिकराव ठाकरे , काँग्रेस प्रभारी-तेलंगण

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तेलंगणामध्ये मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या सरकारचा भ्रष्टाचार, घराणेशाही, खोटी आश्वासने याबद्दल सामान्य लोकांमध्ये मोठय़ा प्रमाणावर नाराजी होती. या नाराजीचा काँग्रेसला फायदा झाला आहे. स्वतंत्र तेलंगणा राज्याची निर्मिती काँग्रेस पक्षामुळे झाली होती. त्याचे श्रेय अखेर काँग्रेसला मिळाले.

चंद्रशेखर राव यांच्या सरकारबद्दल सर्वत्र नाराजीची भावना होती.  सरकारमध्ये मोठय़ा प्रमाणावर भ्रष्टाचार होता. याचा सामान्य नागरिकांना प्रचंड त्रास होत होता. राव यांच्या कुटुंबातील व्यक्तींच्या राज्यकारभारावरील प्रभावाने तर हद्दच गाठली होती. स्वत: चंद्रशेखर राव मुख्यमंत्री, मुलगा मंत्री, भाचा मंत्री, मुलगी आमदार व अन्य नातेवाईकही महत्त्वाच्या पदांवर असे चित्र होते. पक्षाच्या मंत्र्यांनाही काहीही अधिकार नव्हते वा त्यांना स्वातंत्र्यही नव्हते.  चंद्रशेखर राव यांच्या सरकारच्या विविध योजनांची प्रसिद्धीच अधिक झाली. या योजनेचा सामान्य नागरिकांना लाभ मिळाला नव्हता. नुसती जाहीरातबाजी करून चालत नाही, हा संदेश तेलंगणच्या निकालातून स्पष्ट होतो. त्याचप्रमाणे लोकांना गृहित धरणाऱ्यांचा फुगा कसा फुटतो, हेही हा निकाल सांगतो.

हेही वाचा >>>शिवराजसिंह यांचा विजय कृषी-प्रगतीमुळे!

 ‘रयतु बंधू’ किंवा ‘दलित बंधू’ या योजनांची चंद्रशेखर राव यांनी जाहीरातच अधिक केली. शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होत नव्हता. शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसत होती. शेतकऱ्यांचा तांदूळ खरेदी करण्याचे आश्वासन चंद्रशेखर राव देत होते ,पण तांदूळ खरेदी केला गेला नाही. शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यात येत होती. एकूणच सरकारबद्दल सर्वत्र नाराजीची भावना दिसत होती. त्याचा मुख्यत्वे काँग्रेसला फायदा झाला.  काँग्रेसने प्रचारात चंद्रसेखर राव सरकारच्या गैरकारभारावर नेमके बोट ठेवले. सरकार सर्व आघाडय़ांवर कसे अपयशी ठरले आहे हे जनतेला दाखवून दिले. काँग्रेसने दिलेली पाच आश्वासने लोकांच्या पसंतीस उतरली. त्यातूनच जनतेने काँग्रेसला कौल दिला आहे. कर्नाटकात काँग्रेसने दिलेल्या पाच आश्वासनांची मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत अंमलबजावणी करण्यात आली. त्याची आठवण पक्षाने मतदारांना करून दिली होती. लोकांमध्ये काँग्रेसबद्दल यातूनच विश्वासाची भावना निर्माण झाली. हे सारे घटक काँग्रेसला फायदेशीर ठरले.

स्वतंत्र तेलंगणा राज्याच्या निर्मितीसाठी काँग्रेसचे योगदान मोठे होते. तत्कालीन यूपीए सरकारने स्वतंत्र तेलंगणा राज्याच्या निर्मितीला हिरवा कंदिल दाखविला होता. स्वतंत्र तेलंगणा राज्याच्या निर्मितीचे अखेर काँग्रेस पक्षाला श्रेय मिळाले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: There is widespread dissatisfaction among the people about the corruption of chief minister k chandrasekhar rao government in telangana amy
Show comments